Pune : शेखर गायकवाड यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती; सौरभ राव यांची बदली!

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सौरभ राव यांची ‘साखर आयुक्त’ म्हणून बदली केली आहे. तर, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची ‘पुणे महापालिका आयुक्त’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. या दरम्यान, सौरभ राव यांनी सर्वसाधारण सभेला पूर्ण वेळ हजेरी लावून नगरसेवकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. सौरभ राव यांनी जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ महापालिका आयुक्त म्हणून काम केले. 2014 मध्ये त्यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. नागपूरमध्येही त्यांनी काम केले आहे.

ठाकरे सरकार सत्तेत येताच सौरभ राव यांचीही उचलबांगडी करण्यात आली. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आता नवीन आयुक्त की जुने आयुक्त मांडणार? याची उत्सुकता लागली आहे.

तर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू ए. जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता यापुढे असणार आहे. याचबरोबर तुकाराम मुंढे यांची बदली नागपूर येथे महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिका आयुक्तपदी निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांची बदली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे.

साखर आयुक्त’ सौरभ राव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.