Pune : उसने पैसे परत मागितल्यावरून मित्रानेच केला तरूणाचा खून

एमपीसी न्यूज – उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मित्रानेच कोयत्याने वार करून एका तरूणाचा खून केल्याची घटना रविवारी (दि. 9) रात्री दीडच्या सुमारास कोंढवा येथील भाग्योदयनगर मधील मक्का टेरेस बिल्डींग समोर घडली.

जुबेर युन्नुस सय्यद (वय 22, रा.रामटेकडी, हडपसर) असे खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी फैयाज शेख (वय 24, रा. रामटेकडी, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. शेहबाज शाकीर शेख (वय 20, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी हडपसर येथे राहणा-या जुबेर सय्यद याच्याकडून त्याचा मित्र शेहबाज याने काही दिवसांपूर्वी 5 हजार रूपये उसने घेतले होते. जुबेरने ब-याच वेळा शेहबाज यांच्याकडे पैशांची मागणी केली. तरीदेखील तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. रविवारी त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. या वादातून रागाच्या भरात शेहबाज याने जयबर याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात जुबेर गंभीररित्या जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.