Pune : प्रकाश जावडेकर यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अलीकडेच पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एक वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याचा निषेध करीत आज पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

शाळांसाठी नेहमी सरकारकडे मदतीचा कटोरा घेऊन का येता ? त्याऐवजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी पैसे घ्या, असे वक्तव्य केले होते. पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शाळेत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. जगभरातील नामवंत शैक्षणिक संस्था माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीवरच चालतात असेही जावडेकर म्हणाले होते. या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी जावडेकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तुपे म्हणाले, ” रिलायन्स जिओला हजारो कोटी द्यायचे अन शाळेला भिकेचा कटोरा घेऊन येऊ नका सांगतात. मग हे सरकार नक्की कोणासाठी आहे हे सांगा ? असा प्रश्न त्यांनी केला. प्रकाश जावडेकर ज्या वेळेस पुण्यात येतील त्या वेळेस भीक मागून त्यांना पैसे पुरवले जातील असेही तुपे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.