Pune : पर्यावरणातील महत्वाचा घटक म्हणून गवताळ प्रदेशांकडे पाहण्याची गरज -प्रतिक जोशी

एमपीसी न्यूज – वाढत्या शहरीकरणामुळे, माळरान किंवा पडीक जमीन समजून मोठमोठाले हायवे अथवा रस्ते, अशा जमिनींवर विकासाच्या नावाखाली सुरू असलेले प्लॉटींग, सपाट मैदानी परिसरामुळे वाढत असलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे गवताळ प्रदेश नष्ट होत आहेत. याचा परिणाम बहुतांशी विनाशकारी ठरू शकतो. त्यामुळे महत्वाचा घटक म्हणून गवताकडे पाहण्याची गरज असून या अधिवासाचा अजून अभ्यास करून ते समजून घेण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रतिक जोशी यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रतिक जोशी म्हणाले, “झाडे लावा, झाडे जगवा” हे खूपच उत्तम धोरण जे आपण पूर्वी पासून पाळत आलो आहोत, पण माळरानं ही नैसर्गिक रीत्या गवताळ प्रदेश असून तिथे राहणारे लांडगे,तरस, खोकड, कोल्हा, चिंकारा, काळवीट, अनेक पक्षी प्रजाती हे अशाच गवताळ आणि खुरट्या झाडांचा अधिवासात राहतात आणि सरावलेले असतात, त्यावर वेगवेगळ्या झाडांची लागवड केल्यास तो अधिवास बदलतो आणि तो नैसर्गिक न राहता त्यात मनुष्याचा हस्तक्षेप येतो ज्याचा परिणाम या प्राण्या पक्ष्यांवर होतो. अशी माळरानं व गवताळ प्रदेश वाचविण्यासाठी त्यांचा सखोल अभ्यास व या विषयी लोकानमधे जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिक जोशी म्हणाले.

तर, भौगोलिक दृष्टया गवताळ किंवा माळरान ठिकाणी खूपच कमी पाऊस असतो, मैदानी प्रदेश, भूजल पातळी नेहमीच कमी, गवतांच्या लांबसडक पट्ट्यामध्ये काही भाग खडकाळ मुरुमाचा  पाहावयास मिळतो. झाडांची संख्या कमी आणि त्यातही काटेरी झाडांची तुरळकता आढळते.  गवत प्रजाती या मातीमध्ये कमी उंचीने वाढतात. पूर्णपणे जमिनीवर पांघरलेली असतात. शाकाहारी प्राणी गवत चरल्यावरही त्यांची देठे पुन्हा वाढतात. उन्हाळ्यातील तप्त लहरींनी जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन नाजूक गवत पात्या कोमेजून जातात.  परंतु ते मरत नाहीत. त्यांच्या बिया मातीत रुजतात. कालांतराने ऋतू बदलतो. वसंताचे आगमन होते. प्रवासी पक्षी आणि प्राणी या भागात सालाबादप्रमाणे पुन्हा येतात.

नव्या उमंगाने गवत पात्यांना पालवी फुटते.  आणि पुन्हा निसर्ग चक्राच्या नव्या पर्वाकडे वाटचाल सुरु होते. त्या अधिवासातील सर्व सजीवांना;अपृष्ठवंशीय जसे नाकतोडे, फुलपाखरू,शेणकिडे, काजवे, विंचू आणि कोळी ते वर स्थरातील सस्तन प्राणी आणि त्यांच्या कळपांना ऊर्जेचा मुख्य स्रोत बनते. एकतर गवताळ प्रदेश राहिले नसल्याने त्यांचे अधिवास कमी होऊ लागले आहेत. पशुपक्ष्यांच्या शिकारीही वाढल्या आहेत. सरडे, पाली यांच्या विविध जातींची शिकार होते. हे धोक्याचे लक्षण असून याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचे जोशी यांनी सांगितले.

गवताळ प्रदेशाचे महत्व, तेथील जैवविविधता. निसर्गातील त्याचे स्थान, या प्रदेशाला असणारे धोके, त्यांचे संवर्धन- संरक्षण विषयावर आधारीत प्रतिक जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन वनराईतर्फे करण्यात आले होते. यावेळी प्रास्तविकातून वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित वाडेकर यांनी केले, तर आभार अनीश परदेशी यांनी मानले. यावेळी वनराईचे प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर, मुख्य वित्त अधिकारी सुधीर मेकल, मुख्य प्रकल्प संचालक जयवंत देशमुख व पर्यावरण वाहिनीचे भारत साबळे उपस्थित होते.

वनराई संस्थेच्या वतीने दर महिन्यातील पहिल्या शनिवारी विविध विषयांवरील संशोधकांचे व्याख्यान आयोजित करण्यात येते. त्यातील‘गवताळ प्रदेशाचे महत्व’ हे दुसरे व्याख्यान होते. प्रतिक जोशी हे गवताळ प्रदेशातील वन्यजीवांवर गेली अनेक वर्षे संशोधन करत आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण या संस्थेद्वारे आधारित असणा-या प्रकल्पात ते सहभागी झाले असून तरस आणि लांडगा या प्राण्यांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. गेल्या महिन्यात ‘सरडा’ या विषयावर व्याख्यान झाले. तर पुढच्या महिन्यात’विविध प्रजातींचे पक्षी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.