Pune News: ‘आयोडिन मॅन’ डॉ. पांडव यांच्या संशोधनामुळे जगात भारताची मान उंचावली – डॉ. अविनाश भोंडवे

वनराई संस्थेच्या वतीने पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. चंद्रकांत पांडव यांचा गौरव

एमपीसी न्यूज – ”आयोडीनयुक्त मिठाचा वापर केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम मेंदूवरही होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात याचे सेवन योग्य प्रमाणात झाले पाहिजे. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर डॉ. चंद्रकांत पांडव यांनी संशोधन केले. देशाविदेशात त्यांच्या या कामाची दखल घेतली गेली. डॉ. पांडव यांच्या संशोधनामुळे आतापर्यंत अनेक देशांना फायदा झाला आहे. त्यामुळे जगामध्ये भारताची मान उंचावली गेली” असल्याची भावना डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली.

‘आयोडिन मॅन’ म्हणून ओळख असलेले आणि नुकताच पद्मश्री किताब मिळालेले डॉ. चंद्रकांत पांडव यांचा सत्कार वनराई संस्थेने आयोजित केला होता. वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, पंडीत वसंतराव गाडगीळ, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, ”कुशाग्र बुद्धीच्या जोरावर डॉ. पांडव यांनी शिक्षणात प्रगती करीत ग्रामीण भागापासून सुरुवात करत दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेपर्यंत (एम्स) मजल मारली. प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत झालेल्या या माणसाने ‘एम्स’मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि चार दशके तिथे अध्ययन, अध्यापन आणि वैद्यकीय सेवा केली. केवळ वैद्यकीय सेवा करत न थांबता त्यांनी पुढे संशोधनाला सुरुवात केली आणि त्यात यशस्वी झाले हि अभिमानाची बाब आहे”.

डॉ. पांडव म्हणाले की, ”पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी वनराईची स्थापना ज्या उद्देशाने केली ते सफल होताना दिसत आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने डॉ. धारिया हे ‘भारतरत्न’च आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.