Pune News : ‘कोविशील्ड’ लसीवर आक्षेप घेणाऱ्या तक्रारदारावर सिरम ठोकणार 100 कोटींचा दावा

एमपीसी न्यूज – ‘कोविशील्ड’ या लसीवर चेन्नईतील एका स्वयंसेवकाने घेतलेला आक्षेप ‘सीरम’ इन्स्टिट्यूटनं फेटाळून लावला आहे. संबंधित स्वयंसेवकाने दिशाभूल करणाऱ्या केलेल्या आरोपामुळे संस्थेची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार असल्याचे सिरमने म्हंटल आहे.

‘कोविशील्ड’ या लसीवर चेन्नईतील एका स्वयंसेवकाने आक्षेप घेत या लसीच्या प्रायोगिक डोसमुळं आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम झाल्याचा आरोप त्याने केला होता. तसेच, या लसीच्या चाचण्या तातडीनं थांबवाव्यात व आपल्याला पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यानं केली होती.

त्यावर ‘सिरम’ने तात्काळ पत्रक प्रसिद्धीला देऊन संबंधित स्वयंसेवकाचे आरोप खोडून काढले आहेत. ‘तक्रारदाराने नोटिशीद्वारे केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याबद्दल आम्हाला सहानुभूती नक्कीच वाटते; परंतु त्याच्या प्रकृतीतील बिघाडाचा आणि लसीचा काहीही संबंध नाही. त्यामुळं त्यानं लसीवर खापर फोडणं हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचे सिरमने म्हंटल आहे.

स्वयंसेवकाला जाणवणारा त्रास लसीमुळे होत नसल्याची पूर्ण कल्पना वैद्यकीय पथकाने त्याला दिली होती, तरीही त्यानं याबाबतीत जाहीर आरोप करण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या या कृत्यामुळं संस्थेची बदनामी झाली आहे. पैसे उकळण्याच्या हेतूनं त्यानं हे कृत्य केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

त्यामुळं आम्हीच त्यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार दाखल आहोत, असं ‘सिरम’नं म्हटलं आहे.

‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकी कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीच सीरमला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला होता. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.