Pune News : जे व्यापारी दुकाने उघडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज – नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने काढला आहे. व्यापारी वर्गाने या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्यामुळे महापालिका प्रशासन आणि व्यापारी वर्ग आमने-सामने आले आहेत.

दरम्यान व्यापारी वर्गाला गर्भित इशारा देताना जे व्यापारी दुकाने उघडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी दिले आहे.

30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आज पुणे व्यापारी महासंघाने विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदवला असून उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता दुकाने उघडण्यात येणार आहेत.

पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना यावेळी जी कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी अशा शब्दात खुले आव्हान दिले आहे.

पण महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी या भूमिकेविरोधात पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना व्यापारी वर्गाला सरकारी आदेशाचे पालन करण्याची तंबी दिली आहे. शासनाचा आदेश त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनासह सर्वांची जबाबदारी आहे. पण या नियमाचा जे व्यापारी भंग करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासाठी साठ जणांची टीम पाहणी करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.