Pune News : इंजिनिअरिंगचा प्रथम वर्ष अभ्यासक्रम जाहीर करा : युवा सेनेची मागणी

एमपीसीन्यूज : इंजिनिअरिंगचा प्रथम वर्ष अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लवकर जाहीर करावा तसेच बीए, बीकॉम, बीबीए व अन्य पदव्युत्तर परीक्षा 2019  क्रेडिट पॅटर्न परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी युवा सेना विद्यापीठ कक्षाने परीक्षा संचालक व विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात युवा सेनेच्यावतीने परीक्षा संचालक व विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जुलै महिना सुरु झाला तरी अद्याप इंजिनिअरिंगचा प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षांचा अभ्यासक्रम नेमका कसा असणार, याबाबत कोणतीही स्पष्टता विद्यापीठाकडून जाहीर झालेली नाही. विद्यापीठानेही अभ्यासक्रम जाहीर केलेला नाही.

इंजिनीअरिंगच्या परीक्षेसाठी सहा युनिट असतील, किंवा दोन युनिट सोडून पुढच्या युनिटची परीक्षा होणार असल्याचे काही विद्यालयातील शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. काही शिक्षक पहिल्या सेमिस्टर प्रमाणे तीन युनिटची परीक्षा होणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे बीकॉम, बीबीए व अन्य पदव्युत्तर परीक्षा 2019 क्रेडिट पॅटर्न परीक्षेचे प्रथम व द्वितीय वर्षाचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. या परीक्षा 12 जुलैपासून होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच या दोन्ही परीक्षांबाबत लवकरात लवकर स्पष्टता करून वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवा सेना कक्षाचे अध्यक्ष कुणाल धनावडे, सरचिटणीस परमेश्वर लाड, सचिव ज्ञानंद कोंढरे, उपाध्यक्ष विशाल हुलावळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.