Pune News : केवळ अँमिनिटी स्पेस न विकता,भाजपने पुणे शहरालाच विकावे – आबा बागूल

एमपीसी न्यूज – पुणे शहरात नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ठेवण्यात आलेल्या अँमिनिटी स्पेस 30 वर्षाच्या भाडे कराराने देण्याचा सत्ताधारी भाजपने घेतलेला निर्णय हा पुणेकरांच्या हिताविरुद्ध आहे.

उत्पन्न वाढीसाठी म्हणून खोटे दिखाऊ आकडे जनतेपुढे मांडून त्यातून शेकडो कोटी रुपये मिळणार आहे असा अभास ते निर्माण करीत आहेत. जनतेच्या हितासाठी उपयोगी पडणारे अनेक प्रकल्प या अँमिनिटी स्पेसवर उभारता येऊ शकत असतानाही विशिष्ट लोकांच्या व व्यावसायिकांच्या  फायद्यासाठी अशा पद्धतीने अँमिनिटी स्पेस 30 वर्षांच्या कराराने देण्याचा घाट त्यांनी घातला असून उत्पन्न वाढीबद्दल जर का त्यांना एवढेच प्रेम आहे. तर त्यांनी केवळ अँमिनिटी स्पेसच कश्याला पूर्ण पुणे शहरच विकून टाकावे. म्हणजे त्यांचा मालामाल होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे परखड मत पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी  व्यक्त केले

 

ते पुढे म्हणाले की, दीर्घकाळ काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यापासून अँमिनिटी स्पेस या नागरिकांच्या हितासाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती आरक्षण जरी नसले तरी विविध नागरी हिताचे प्रकल्प तेथे उभे करता येणे सहज शक्य असते. त्या अँमिनिटी स्पेसवर अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता ही घ्यावी लागत असते. अशावेळी या अँमिनिटी स्पेसचा उपयोग नागरिकांच्या हिताचे प्रकल्प तेथे उभारण्याच्या ऐवजी उत्पन्न वाढीच्या गोंडस नावाखाली या अँमिनिटी स्पेस 30 वर्षांसाठी हितसंबंधीना देण्याचे त्यांचे धोरण हे पुणे शहराच्या दृष्टीने अतिशय चुकीचे व घातक आहे.

भाजपने शहराच्या विकासासाठी  गेल्या 5 वर्षात संधी असूनही कोणताही मोठा प्रकल्प टाकला नाही. एवढेच काय शहरात रस्त्यावर खड्डे असून शहरात खड्डे नाहीत असे ते खोटे बोल पण रेटून बोल असे खोटे बोलतात.

ही त्यांची संस्कृतीच आहे. उत्पन्न वाढीसाठी रेव्हेन्यू कमिटी नेमावी असा आग्रह मी धरलेला होता व त्याची स्थापनाही झाली पण रेव्हेन्यू कमिटीचे काम पूर्णपणे ठप्प करून उत्पन्न वाढीचे मार्ग शोधण्याऐवजी हितसंबधितांना, विकासकांना मालामाल करण्यासाठीच अँमिनिटी स्पेस 30 वर्षासाठी देण्याचा डाव बहुमताच्या आधारे त्यांनी केला. मला तर वाटते त्यांनी पुणे शहर एकदाच विकून टाकावे. म्हणजे भाजप,हितसंबंधीय व व्यावसायिक आनंदी होतील व पुन्हा भाजपला आर्थिक निधीसाठी काही करावे लागणार नाही. पुणेकर नागरिक यासाठी सजक असून काँग्रेस पक्ष भाजपच्या पुणेकर विरोधी,जनता विरोधी धोरणाला कडाडून विरोध करेल वेळप्रसंगी त्यासाठी न्यायालायत देखील धाव घेऊ असा परखड इशारा आबा बागूल यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.