Pune News : मंडईतील शारदा गणपतीच्या मंदिरात धाडसी चोरी, रोख रक्कम आणि दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात असणाऱ्या मंडई येथील शारदा गणपतीच्या मंदिरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करण्यात आली. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या आवारात प्रवेश करत वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

पुण्यातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मंदिरात अशा प्रकारे चोरी झाल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पुण्याच्या मध्यवस्तीतील मंडई परिसरात शारदा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा ही आहे. असे असतानाही अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश करत तब्बल वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या मंदिरापासून काही अंतरावर पोलीस चौकी आहे. हा परिसर सातत्याने गजबजलेला असतो. तरीदेखील या मंदिरात अशाप्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस आणि गुन्हे शाखेचे प्रथक घटनास्थळी दाखल झाली आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सध्या सुरू आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.