Pune News : राडारोडा नदीपात्रात टाकल्याप्रकरणी महामेट्रो ठेकेदाराला बजावली नोटीस !

एमपीसी न्यूज : संगमवाडी नदीपात्रात मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी राडारोडा बाहेरून आणून टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून महामेट्रोच्या ठेकेदार जे. कुमार इन्फ्राटेकला नोटीस बजावल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.

या प्रकरणाची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्‍तांनी स्वत: नदीपात्राची पाहणी केली. त्यात, हा राडारोडा टाकल्याचे समोर आले.

दरम्यान, या पाहणीनंतर महापालिकेने या ठेकेदारास 25 हजार रुपयांचा दंड भरण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, महामेट्रोचे काम असल्याचे सांगत तसेच राडारोडा टाकण्यास पालिकेनेच परवानगी दिली असल्याचे सांगत हा दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने केवळ नोटीस बजावित यावर पडदा टाकला आहे.

संगमवाडी नदीपात्रात महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी कामाच्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी ठेकेदाराकडून नदीपात्रात दगड, मातीचा भराव टाकून रॅम्प बनवला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून राडारोडा आणून हा रॅम्प बनवल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, नदीपात्रातील राडारोड्याबाबत न्यायालयातही याचिका दाखल आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकारची तक्रार आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्‍त अजित देशमुख यांनी सकाळी ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयाचे पथक कामाच्या ठिकाणी गेले असता, महामेट्रोचे अधिकारी तसेच ठेकेदारांनी हा राडारोडा काढून घेऊ असे सांगण्यास सुरुवात केली. तसेच, या रॅम्पसाठी महापालिकेची परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे राडारोडा बाहेरून आल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने संबंधीत ठेकेदराच्या अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड भरण्याच्या सूचना केल्या.

मात्र, लगेच या कामासाठी आम्हाला परवानगी असल्याचे सांगत मेट्रो तसेच ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांनी दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने तातडीने या प्रकल्पाच्या ठेकेदारास नोटीस बजावली असून 25 हजारांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार म्हणाले, मेट्रो प्रकल्प हा शासकीय प्रकल्प असला तरी त्यांच्याकडून नियमानुसार काम करणे अपेक्षीत आहे. राडारोड्याचा भराव करण्यात आल्याचे तपासणीत आढळून आल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, यापुढेही त्यांच्याकडून अशाचप्रकारे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्यास वेळप्रसंगी त्याचे कामही थांबविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.