Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘शमी-मंदार माळ’ अर्पण

सुमारे 108 मणी आणि 2850 खडयांची कलाकुसर व 85 तोळे सोन्याच्या सुवर्णसाज ; श्री क्षेत्र मोरगाव येथून शमी व मंदारच्या काष्ठा

एमपीसी न्यूज – भगवान श्रीगणेशांना दुर्वेसमान प्रिय असणा-या दोन गोष्टी म्हणजे शमी व मंदार. शमीच्या पूजनाचा दिवस विजयादशमी रुपात साजरा केला जातो. गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार हे केवळ वृक्ष नव्हेत, तर श्री गणेशांचे दृश्य रुप म्हणून पूजिले जातात. त्यामुळे दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली.

प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून एकूण 85 तोळे सोने वापरण्यात आले आहे. तर, श्री क्षेत्र मोरगाव येथून शमी व मंदारच्या काष्ठा उपलब्ध झाल्या आहेत. मंदिरामध्ये विश्वस्तांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करुन श्रीगणेश मूर्तीला ही माळ घालण्यात आली आहे.

शमी-मंदाराच्या झाडाच्या लाकडापासून साकारण्यात आलेले मणी या माळांमध्ये लावण्यात आले आहेत. मुख्य मूर्तीला मोठी व पूजेच्या चांदीच्या मूर्तीला लहान अशा दोन माळा तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक माळेमध्ये 108 मणी व 1 मेरु मणी लावण्यात आला आहे.

याशिवाय सुमारे 2850 पांढ-यां खड्यांची कलाकुसर देखील करण्यात आली आहे. राजू वाडेकर यांनी सलग 15 दिवस स्वत: च्या हाताने ट्रस्टच्या गणपती सदन या इमारतीमध्ये मणी घडविले आहेत. तसेच त्या माळेला पी.एन.जी.ज्वेलर्सच्या कारागिरांनी सुवर्णसाज चढविला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.