Pune News : राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे भामा-आसखेडला विलंब : जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण करण्यात आले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत असून गेल्या वर्षभरात उर्वरीत 5 टक्के काम करण्यात सरकारला अपयश आले आहे. मात्र, पुणेकरांना भामा-आसखेडचे पाणी देण्यास भाजप कटिबद्ध असून, त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यांनी दिली.

मुळीक म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पुणे आणि पिंपरीला भामा-आसखेडचे पाणी देणार नाही, अशी सरळसरळ धमकी दिली आहे. भामा-आसखेड योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकवाक्यता नाही. स्थानिक आमदार केवळ बैठका घेत आहेत. प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. खरं तर आत्तापर्यंत पुणे-नगर रस्त्यावरील नागरिकांना भामा-आसखेडचे पाणी मिळाले असते. परंतु नियोजनाचा अभाव आणि स्थानिक आमदारांच्या राजकीय उदासिनतेमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश आले आहे.’

‘वडगावशेरी, चंदननगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा या शहराच्या पूर्व भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी सात वर्षांपासून भामा-आसखेडचे योजनेचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची क्षमता 200 एमएलडी इतकी आहे. योजनेचा खर्च सुमारे 418 कोटी रुपये आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर योजनेला

आवश्यक असणारा महापालिकेच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे योजनेला गती आली. मात्र योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्‍न राज्यातील महाआघाडी सरकारला अपयश येत आहे. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.