-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठीच्या जाचक अटींतून महापालिकेला वगळा : काँग्रेसची महसूलमंत्र्यांकडे मागणी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रोड (एचसीएमटीआर), कचऱ्याचा प्रश्न, रस्ता रुंदीकरण अशा विविध मोठ्या प्रकल्पांंसाठी आरक्षित जागा आहेत. परंतु, पुणे महापालिकेला भूसंपादनासाठी 30 टक्के आगाऊ रक्कम भरण्याच्या जाचक अटीमुळे विकासकामे खोळंबली आहेत. त्यामुळे या अटीतून राज्यसरकारने महापालिकेला वगळावे, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

पुणे शहराच्या 1987 व 2017 च्या विकास आराखड्यात ‘वापरात असलेली जागा (एक्झेस्टिंग लँड युझ) आणि प्रस्तावित वापरण्यात येणारी जागा (प्रपोज लँड युझ)’ असे वर्गीकरण असून वापरण्यात येणाऱ्या जागेचे भूसंपादन करणे अत्यंत गरजेचे आहे.

परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय कमकुवत होत असल्याने जागेचे भूसंपादन होत नाही. व टीडीआरचे दर कमी जास्त होत असताना महानगरपालिकेची भूसंपादन प्रक्रिया अतिशय संथ गतीने होते.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

नवीन भूसंपादन कायद्यातील अधिसूचने नुसार महानगरपालिकेला संपादन मूल्याच्या 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करावी लागते. ही रक्कम अंतिम निवाडा घोषित होईपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे अशीच पडून राहते व त्याचे कुठलेही व्याज महापालिकेला मिळत नाही.

परिणामी कोट्यवधी रुपये अडकून राहतात. त्यामुळे सामान्य करदात्यांनी प्रामाणिकपणे भरलेल्या करावर चालणाऱ्या महापालिकेवर करोडो रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. पुणे शहरातील मोठे विकास प्रकल्प व प्रमुख रस्ते रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेमुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास अडचण निर्माण होत आहे, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

ज्याप्रमाणे राज्यसरकारने पाटबंधारे खात्याला भूसंपादन करत असताना 30 टक्के आगाऊ रक्कम भरण्यावर सवलत दिली. त्याप्रमाणे पुणे शहरात रस्ता रुंदीकरणासह शहराच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांसाठी आरक्षित जागेचे भूसंपादन करत असताना 30 टक्के रक्कम निवाडा घोषित होण्यापूर्वीच भरण्याच्या जाचक अटीतून महापालिकेला वगळावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात प्रस्ताव शासनाला पाठवा यावर तातडीने निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.