Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणून प्रत्यक्ष बैठक घ्या : विशाल तांबे यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणून प्रत्यक्ष बैठक घ्या, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून पुणे शहरामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असे सर्वच आपापल्या परीने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

या सर्व काळामध्ये लोकप्रतिनिधींना स्वतःचे मत मांडण्यासाठी तसेच या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना आणि सूचना प्रशासनापुढे मांडण्याचे आहेत त्यामध्ये फोन द्वारे पत्राद्वारे, किंवा विशेष करून मुख्य सभेच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडणे अपेक्षित आहे. पण, मागील सात महिन्यांपासून एकही मुख्य सभा आजपर्यंत घेण्यात आलेली नाही.

किंबहुना प्रशासनाचे प्रमुख म्हणून सुद्धा आजपर्यंत आयुक्त म्हणून कोणीही क्षेत्रीय कार्यालय निहाय जाऊन बैठक घेतलेली नाही. स्थानिक प्रश्न व या कोरोना संसर्ग काळातील नागरिकांच्या अडचणी या परिस्थितीत सर्व प्रथम लोकप्रतिनिधीना सामोरे जावे लागते. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लोकप्रतिनिधींची बैठक घेणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या सूचना त्यांचे प्रश्न हे जाणून घेणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधींच्या सूचना या निश्चितच रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला उपयुक्त ठरतील. त्यांचा असणारा जनसामान्यांची संवाद स्थानिक प्रश्नांची जाण आणि या संपूर्ण लॉकडाउनपासून ते आत्तापर्यंत हे सर्व काळामध्ये आलेल्या अनुभव व लोकांच्या देखील आलेल्या सूचना या सर्वांचा विचार प्रशासनाने एकत्र करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितपणे पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.

म्हणून आपण लवकरात लवकर पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय निहाय बैठकांचे आयोजन करावे आणि याकरता आपण स्वतः व्यक्तिश: हजर राहावे, अशी विनंती आयुक्तांना विशाल तांबे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.