Pune News : कोरोनाकडे दुर्लक्ष करून प्रशासन निविदा प्रक्रियेत मग्न : काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप

कोरोना आटोक्यात न आणल्यास आंदोलन करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – वारंवार सांगूनही पुणे महापालिका काहीही उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत आहे. ते तातडीने आटोक्यात आणा, अन्यथा काँग्रेसतर्फे आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी (दि. 9) दिला आहे. कोरोनाकडे दुर्लक्ष करून प्रशासन निविदा प्रक्रिया राबवित असल्याचा आरोपही बागवे यांनी केला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून काँग्रेस पक्षाने खूप संयम बाळगला आहे.

पण, आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. युद्धस्तरावर योग्य त्या उपाययोजना केल्या नाही तर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होऊन अनेकजण प्रशासकीय हलगर्जीपणामुळे आपला जीव गमावतील, अशी भीतीही रमेश बागवे यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे आता महापालिकेची यंत्रणा निविदा प्रक्रियेत न अडकवता ती कोरोनाच्या नियंत्रणात व्यस्त करावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.

कोरोनाची परिस्थिती शहरातील विविध प्रभागात चिंताजनक झालेली आहे. प्रत्येक नगरसेवक सभागृहाच्या निदर्शनास आणायची इच्छा सोशल डिस्टनसिंगचे पालन करून व्यक्त करीत असताना जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी शासन आदेशाचे निमित्त करून कोरोनावर चर्चा होऊ दिली नाही.

या आजाराचा सर्वाधिक फटका पुणेकरांना बसला आहे. शहरात 100 वा रुग्ण ज्यावेळी आढळला होता. त्यावेळीच काँग्रेसतर्फे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना सावध केले होते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा आजार भयंकर होणार असल्याचे सांगितले होते.

त्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये बेडस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचीही मागणी केली होती.

ॲम्ब्युलन्स घेण्यासही सांगितले होते. मात्र, कोरोनाकडे दुर्लक्ष करून प्रशासन निविदा प्रक्रिया राबवित असल्याचा आरोपही बागवे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.