Pune News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयाची उद्योगमंत्री देसाई यांनी केली पहाणी

एमपीसी न्यूज – औरंगाबादमधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळयाची उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नऱ्हे- धायरी पुणे येथे आज (शुक्रवारी, दि. 9) पहाणी केली.

यावेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे, आमदार संजय क्षीरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे, शहर अभियंता श्री. पानझडे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दिपक थोपटे, स्थानिक शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सुभाष देसाई म्हणाले, ‘चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांच्या सहका-यांनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल.

हा पुतळा अतिशय रेखीव व देखणा झालेला आहे. या पुतळयाचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल, असा विश्वासही देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.