Pune News : अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याच्याजवळील पैसे लुबाडले

एमपीसी न्यूज – रस्त्यावरून जाणारा एक ट्रॅक्टर अचानक थांबल्याने त्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला. धक्कादायक म्हणजे त्याला मदत करण्याऐवजी काही अज्ञात नागरिकांनी त्याच्याजवळील पैसे चोरून नेले. सोलापूर पुणे महामार्गावरील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला.

सुशील चंद्रकांत देसाई (वय 39) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या बॅगेत असलेले एक लाख 97 हजार रुपये चोरून नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. 13 नोव्हेंबरच्या रात्री ते दुचाकीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलापूर-पुणे महामार्गावरुन जात होते. यावेळी कदमवाक वस्ती येथे रस्त्यावरून जाणारा ट्रॅक्टर अचानक थांबल्याने त्यांची दुचाकी ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात त्यांच्या हाताला, गळ्याला आणि गालाला जबर मार लागला होता.

या अपघाताचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने सुशील देसाई यांची बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये तब्बल एक लाख 97 हजार रुपये होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.