Pune News : स्व.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक, विधवा पत्नी मालमत्ता करमाफी योजना अडकली आचारसंहितेच्या कात्रीत !

एमपीसी न्यूज : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना शहिद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींसह माजी सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शंभर टक्के मालमत्ता कर माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यसरकारकडून नुकताच घेण्यात आला. परंतु, पुणे महापालिकेकडून याबाबतचा प्रस्ताव लालफितीत तर अडकलाच पण हा प्रस्ताव आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्यामुळे हजारो माजी सैनिक, विधवा पत्नींना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून ‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेअंतर्गत शंभर टक्के कर सवलत दिली जाणार आहे. यामुळे पुणे महापालिका क्षेत्रातील हजारो माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकणार आहे.

माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता नि:स्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशसेवा विचारात घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून मालमत्ता करात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरी क्षेत्रातील महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949, मुंबई महापालिका अधिनियम 1988 व महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये याबाबत तरतुदी केल्या आहेत.

तब्बल चार वर्षांपुर्वी म्हणजेच 5 एप्रिल 2016 रोजी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात राहणाऱ्या केवळ संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तांना करातून सूट देण्यात आली होती. त्यानंतर 9 जानेवारी 2017 रोजी संरक्षण दलातील अविवाहित शहिद झालेल्या सैनिकाच्या नामनिर्देशित मालमत्तांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता विविध स्तरातून होणारी मागणी लक्षात घेऊन 9 सप्टेंबर रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने ‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेअंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात राहणाऱ्या राज्यातील माजी सैनिक कुटुंबांना मालमत्ता करातून सूट दिली जाणार आहे.

या योजनेचा राज्यातील सुमारे तीन लाखांहून जास्त कुटुंबांना लाभ होणार आहे. या करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

पुणे महापालिकेचे मालमत्ता व मिळकत कर विभाग प्रमुख उप आयुक्त विलास कानडे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ या योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष लाभ मिळू केल.

दरम्यान, या योजनेसाठी 60 ते 70 सैनिकांनी अर्ज नेेले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला प्रशासकीय पातळीवर सुरूवात झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.