Pune News : महाविकास आघाडीने वेळकाढूपणा केल्यामुळे मराठा आरक्षण रखडलं : फडणवीस

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणा केला. ज्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली; त्याच खंडपीठाकडे पुन्हा अर्ज करून आरक्षण उठवण्याची मागणी केली. आरक्षणावर घटनापीठ समिती स्थापन करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली असून प्रत्येक पातळीवर महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळे मराठा आरक्षण रखडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, विजबिलांबाबत सरकारने घुमजाव केले आहे. या सरकारची एक वर्षात एकही उपलब्धी नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. पंचनामेही अर्धवट आहेत. कोरोना काळात विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही.

बैठकांना बोलावण्यात आले नाही. विरोधकांनी केलेल्या सूचननेवर कारवाई केली जात नाही. सरकाराबाबत जनतेसह पदवीधर आणि शिक्षकांमध्ये असंतोष असून हा असंतोष संघटित झालेला पदवीधरच्या निवडणुकीत दिसेल असेही ते म्हणाले.

भाजपाने बोगस नोंदणी केल्याचे वक्तव्य करून जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. ईव्हीएम मशीनवर आरोप करता येत नाही म्हणून ‘कव्हर फायरिंग’ केले जात आहे. हा आरोप म्हणजे पुणेकर मतदारांवर अविश्वास दाखविण्याचाच प्रकार आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

भाजपाचे 105 आमदार असूनही विरोधात बसावे लागल्याने कांड्या पिकविल्या जात असल्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ‘अजित पवारांचे दुखणे मला माहिती आहे,’ अशी कोपरखळी त्यांनी मारली.

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना विविध ‘विशेषणां’नी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर फडणवीस म्हणाले, राजकारणात टीका होणे आवश्यक आहे. परंतु, राजकारणाचा विशिष्ट स्तर ठेवला जायला हवा.

आमच्याकडून आम्ही तो स्तर राखूच पण विरोधकांनीही तो राखावा. आमच्याकडून हा विषय संपला, असेही फडणवीस म्हणाले.

सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावलेले नाहीत तसेच आम्ही डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. हे अनैसर्गिक सरकार असून ज्या दिवशी ते पडेल; त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, याचाही त्यांनी पुनरुच्चार त्यांनी केला.

‘लव्ह जिहाद’बाबत शिवसेनेचे घुमजाव

लव्ह जिहादच्या मुद्द्यावर शिवसेनेची आग्रही भूमिका होती. ‘सामना’मधून याविरोधात अग्रलेख लिहिले गेले होते. आता मात्र शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला आहे, असा टोमणाही फडणवीस यांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.