Pune News – आमदार चषक राज्यस्तरीय ज्यूनियर ज्यूदो स्पर्धा २१ एप्रिलपासून

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो  स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २१ ते २३ एप्रिल दरम्यान टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार व या स्पर्धेच्या संयोजिका मुक्ता टिळक, तांत्रिक समितीचे सरचिटणीस दत्ता आफळे, भाजपा कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे आणि स्पर्धा संचालक दीपक होले उपस्थित होते.

 

शैलेश टिळक म्हणाले, या स्पर्धेसाठी कसबा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या आमदार निधीतून यासाठी आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळीचे सहकार्यसुध्दा लाभले आहे. आगामी काळात होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघ निवडण्यात येणार असल्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व राहणार आहे.

 

स्पर्धेसाठी राज्यातील ३१ जिल्ह्यातून सुमारे ३५० वर खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धा मुला – मुलींच्या एकूण १६ वजनी गटात होणार आहे. राज्यातील ३५ तांत्रिक अधिकारी या स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी संभाळणार आहेत. खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापकांची निवास व भोजनाची व्यवस्था सर परशूरामभाऊ महाविद्यालयाच्या (स प) होस्टेलमध्ये करण्यात आली आहे.

 

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या, ज्यूदो हा खेळ शालेय स्तरापासून मुला – मुलींनी शिकणे आवश्यक आहे. सध्याच्या काळाची ती गरज आहे, स्वत:चे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक मुला – मुलीने हा खेळ शिकावा. ही स्पर्धा शहरात घेण्यामागे मुख्य उद्देश हाच आहे. शहरातील शालेय मुला-मुलींना ही स्पर्धा पाहण्याची संधी मिळेल. याच बरोबर शालेय स्तरापासून स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून आपल्या पुणे शहरासह महाराष्ट्राचे व भारताचे नावलौकिक करावे. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मुबंई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे सरचिटणीस दत्ता आफळे म्हणाले, या स्पर्धेत १५ वर्षे पूर्ण आणि २१ वषार्खालील मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. मुलांसाठी ५५ किलो वजन गटापासून १०० किलो वजनगटावरील असे ८ तर मुलींसाठी ४४ किलो वजन गटापासून ते ७८ किलोवरील असे ८ वजन गट असणार आहेत. बाहेरील जिल्ह्यातील खेळाडूंचे आगमन २१ एप्रिल रोजी सकाळी होईल. त्यानंतर खेळाडूंची वजने घेतली जाणार आहेत. याचवेळी खेळाडूंच्या जन्म तारखेच्या दाखल्यांची आणि इतर कागदपत्रांची तपासणी होईल. दुपारनंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरूवात केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.