Pune News: कोरोना स्वॅब टेस्ट करणाऱ्या खाजगी लॅबवर महापालिकेचे नियंत्रण नाही- दीपाली धुमाळ 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रोज दोन हजार पाॅझीटिव्ह रूग्ण आढळत आहेत. महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कोरोना स्वॅब टेस्ट व अ‍ॅन्टीजेन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू केले आहेत. याचबरोबर काही खाजगी दवाखान्यात व लॅबमध्ये सुध्दा या टेस्टची व्यवस्था कलेली आहे. परंतु, खाजगी दवाखान्यात व लॅबमध्ये टेस्ट केली जातात, त्याचे रिपोर्ट वेळेत मिळत नाही. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. 

तीन-चार दिवसांनी रिपोर्ट येतात, जोपर्यंत रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत रूग्ण जर पाॅझीटिव्ह आढळला तर तो त्यांच्या कुटुंबात व आजुबाजुच्या परिसरात फिरत असतो. त्यामुळे बाकीच्यांना सुध्दा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. यासाठी त्वरित किमान एक दिवसात रिपोर्ट येणे गरजेचे आहे, असे धुमाळ म्हणाल्या.

खाजगी लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर सोसायटीमधील व भागातील नागरिकांनी टेस्ट केलेल्या असतील तर त्या टेस्ट केलेल्या नागरिकांची पूर्ण माहिती मनपाचे संबंधित अधिकारी व खात्याला देणे आवश्यक आहे. तशी माहिती दिली जात नाही, अशी तक्रार धुमाळ यांनी केली आहे.

कोरोना चाचण्यांबाबत माहिती मिळाल्यास संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्या भागात अथवा सोसायटीची खबरदारी म्हणून कार्यवाही करतील. मात्र, तशी माहिती खाजगी लॅब मनपाला देत नाही. काही रूग्ण सुध्दा ही माहिती देत नाही.  यासाठी कडक धोरण राबविणे गरजेचे आहे. व तशा प्रकारचे आदेश काढणे आवश्यक आहे, असे धुमाळ म्हणाल्या.

वेळेत रिपोर्ट न दिल्याने जर एखाद्या रूग्णाला त्रास झाला तर रिपोर्ट नसल्याने मनपा दवाखान्यात किंवा खाजगी दवाखान्यात उपचार करताना त्या रूग्णांना कोवीड की नाॅन कोवीड अशा प्रकारची संभ्रमावस्था निर्माण होते. अशा परिस्थितीत योग्य उपचार न मिळाल्याने काही वेळेस सदर रूग्णाला आपले प्राण गमवावे लागते,  असे अनेकदा घडले आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

खाजगी दवाखाने व लॅबवर मनपाचे नियंत्रण व लक्ष असणे गरजेचे आहे. खाजगी लॅब वेळेत व योग्य रिपोर्ट देत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.