Pune Corona Update: 1545 रुग्ण कोरोनामुक्त, 1700 नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी) 1,545 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 1,700 नवे रुग्ण आढळले तर 38 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज 6 हजार 67 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1,700 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 31 हजार 781 झाली आहे.  शहरातील 1,545 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 1 लाख 10 हजार 916 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

दिवसभरात 38 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या रोगामुळे 3 हजार 84 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शहरात सध्या 17 हजार 781 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 961 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 494 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या  आणखी वाढ करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीच गंभीर होत चालले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारां विरोधात कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पथके स्थापन  करण्यात आली आहेत.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जीवनावश्यक सेवा, दुकाने, मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन काळात टप्पेनिहाय सुरू करण्यात आलेले आहे. दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वेळोवेळी बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावर अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण 3 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहेत.

वाढत्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिका आणखी कठोर नियम करण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशा प्रकारचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.