Pune News : महापालिकेच्या सदनिकांचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेत होणार !

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या ताब्यात आलेल्या सदनिकांचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी स्वस्त हक्काची घरे उपलब्ध होऊ शकणार आहे.

शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून हस्तांतरीत झालेल्या सदनिका पुणे महापालिकेच्या ताब्यात आहेत. सध्या त्या सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. परंतु भविष्यात या सदनिका विक्रीला काढल्या जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना स्वस्त, परवडणाऱ्या दरांमध्ये हक्काची घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये या सदनिकांचा समावेश केल्यास सदनिकाधारकांना सुलभ कर्ज उपलब्ध तर होईलच परंतु 2 लाख 30 हजार रुपयांचे सबसिडी देखील मिळू शकणार आहे.

झोपडपट्टी निर्मूलन प्राधिकरण (स्लम रिडेव्हलपमेंट ॲथोरिटी – एसआरए) आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त बैठकीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

फ्री टु सेल असलेल्या महापालिकेच्या सदनिकांचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेत केला जाणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या ताब्यातील सदनिका सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल. तसेच राज्यशासनाकडून कर्ज देखील उपलब्ध होऊ शकणार आहे. ही योजना यशस्वीरित्या अंमलात आली तर हजारो नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.