Pune News – मल्टिस्टारर “दिल दिमाग और बत्ती” चे ट्रेलर आणि म्युझिक उत्साहात लाँच

एमपीसी  न्यूज –  पहिल्या पोस्टरपासून उत्सुकता वाढवणाऱ्या सा क्रिएशन्स निर्मित आणि डॉ. निवेदिता एकबोटे प्रस्तुत “दिल दिमाग और बत्ती” या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात उत्साहात झाला. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते, प्रस्तुतकर्त्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्यासह सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
या आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टर्स आणि टीझरने प्रेक्षकांना ८० च्या दशकातील इस्टमन कलर चित्रपटांचा फील दिला आणि आता प्रदर्शित झालेला ट्रेलर  प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन गेला आहे. “दिल दिमाग और बत्ती” चित्रपटाचा ट्रेलर बघून रसिकांना सिनेमामध्ये सिनेमा असे दुहेरी मनोरंजन बघायला मिळणार हे स्पष्ट होत आहे. या चित्रपटातून अभिनेता सागर संत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. पुरुषोत्तम करंडकसारख्या नावाजलेल्या एकांकिका स्पर्धेत चमकल्या नंतर हिंदी शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन आणि आता मराठी चित्रपटात अभिनय असा सागर संतचा प्रवास आहे.

 

ट्रेलरमध्ये चित्रपटातील तारे तारकांचा अतरंगी अंदाज बघून “दिल दिमाग और बत्ती” हा फूल टू धमाल चित्रपट असेल यात शंकाच नाही. त्या काळातील लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला, कॉमेडी, मेलोड्रामा, ढिशुम ढिशुम आणि उत्तम संगीत या गोष्टींनी खचाखच भरलेला “दिल दिमाग और बत्ती” प्रेक्षकांना चार घटिका निखळ मनोरंजन करत 80s ची मजा २०२२ मध्ये देणार आहे.
“दिल दिमाग और बत्ती” या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून यात विविध धाटणीची चार गाणी आहेत. गीतकार हृषीकेश गुप्ते यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहीत राऊत, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा कराडे यांचा आवाज लाभला आहे.

 

सा क्रिएशन्स ची पहिलीच निर्मिती असलेल्या “दिल दिमाग और बत्ती” या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते आहेत. सोनाली कुलकर्णी,  दिलीप प्रभावळकर,  वंदना गुप्ते,  पुष्कर श्रोत्री,  किशोर कदम,  आनंद इंगळे,  वैभव मांगले,  सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट असून छायांकन सलील सहस्त्रबुद्धे यांचे आहे. “दिल दिमाग और बत्ती” २२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.