Pimpri News : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट, पवार म्हणाले…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (मंगळवारी) मुंबईत भेट घेतली. समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काही घटक प्रयत्न करत असतात. परवाचे (सिल्वर ओक) प्रकरण हे त्यातलेच होते. मात्र, तो मार्ग आपला नाही, आपण सर्वांनी शांततेनेच घ्यायचे, असे आवाहन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. पवार यांच्या समर्थकांनी राज्यभर आंदोलन केले. राज्य सरकारनेही कठोर पावले उचलली.

या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकारी शरद पवार यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले. त्यावेळी स्वतः पवार यांनी, आपण सर्वांनी शांततेत घ्यायचे, पोलीस त्यांचे काम करतील, असे म्हणत सर्वांची विचारपूस केली.

शहराध्यक्ष गव्हाणे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे, प्रवक्ते योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पंकज भालेकर आदींचा शिष्ठमंडळात सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.