Pune News : बैठकीसाठी महापौरांनाच डावलणे हे अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण – गणेश बिडकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात बैठक बोलाविली जाते. बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या लोकांच्या यादीत शहराच्या महापौरांचे नाव नसणे हा महापौरांचा नव्हे तर पुणे शहराचा (पुणेकरांचा) अपमान आहे. बैठकीसाठी महापौरांनाच डावलणे हे अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे, अशी टीका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे.

महापालिकेत भाजपचे शंभर सभासद आहेत. शहरात सहा आमदार आणि खासदारही भाजपचे आहेत. अशावेळी दोन आमदार आणि पालिकेत असलेले मोजके नगरसेवक या जोरावर शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुणे शहराच्या कोणत्या विकासाचे नियोजन करत आहेत, असा प्रश्न पडतो. शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक घेण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली होती तर यासाठी राष्ट्रवादीचे मोजकेच पदाधिकारी वगळता इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलविण्याची हिंमत का नाही दाखविली. राज्यात महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना, काँग्रेसच्या एकाही शहरातील पदाधिकाऱ्यांना बैठकीला न बोलवता, लपून छपून बैठक आयोजित करण्याची ही वृत्ती चांगली नाही, असेही बिडकर म्हणाले.

विकासाच्या कामात आम्ही कधीही राजकारण करत नाही, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या आणि कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने चांगले काम केले असल्यास त्याचे जाहीर कौतुक उपमुख्यमंत्री पवार करत असतात. पण त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी अशा पद्धतीने राजकारण करत असतील तर ही शिकवण उपमुख्यमंत्री अजितदादा यांची नक्कीच नाही.

कोरोनाच्या काळात गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाने नागरिकांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. सत्ताधारी पक्ष म्हणून केलेल्या कामाची पोहच पावती पुणेकरांनी भाजपला दिलेली आहे. सत्ताधारी म्हणून भाजप आणि महापौरांच्या कामाचे कौतुक सर्वत्र होत असल्यानेच अशा विकास कामाच्या चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी शहराच्या प्रथम नागरिकाच्या नावाचा विसर का पडतो. हे समजण्यासाठी पुणेकर नक्कीच सुज्ञ आहेत, असेही बिडकर यांनी स्पष्ट केले.

शहरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या निमंत्रणामध्ये महापौरांचे नाव नसणे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पटते का? निमंत्रण पत्रिकेतील नावावरून त्यांनी केलेला कांगावा तर सर्वश्रुत आहे. बैठकीच्या चार दिवस अगोदर काढण्यात आलेल्या लोकांच्या यादीत महापौर यांचे नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर हे योग्य नाही, हे शहराध्यक्ष जगताप यांच्या लक्षात आले नाही का? झालेली चूक दुरुस्त करून दोन दिवस अगोदरच वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घालून नियोजन का नाही केले. दुपारी बैठक असताना त्याच दिवशी सकाळीच बैठकीला उपस्थित रहा, असे सांगणे यामध्ये जगताप यांना काहीही गैर वाटत नाही का? असे प्रश्न सभागृह नेते बिडकर यांनी विचारले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.