_MPC_DIR_MPU_III

Pune News : लोकप्रतिनिधी हा मालक नसून जनतेचा सेवक : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : लोकप्रतिनिधी हा मालक नसून जनतेचा सेवक आहे व जनता ही मालक आहे. त्यामुळे सेवकाने आपल्या कामाचा अहवाल हा जनतारुपी मालकासमोर मांडलाच पाहिजे. आपल्या कामाचा लेखाजोखा जाहीररीत्या मांडणे म्हणजे लोकप्रतिनिधीने जनतेप्रती उत्तरदायी असणे महत्त्वाचे आहे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_IV

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील कार्यअहवालाचे प्रकाशन आज, शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपचे पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, शिवाजीनगर मतदार संघातील नगरसेविका नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, आदित्य माळवे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवाजीनगर मतदार संघात नव्याने सुरू झालेल्या ‘अटलवार्ता’ या नियतकालिकाचे प्रकाशन देखील या वेळी फडणवीस यांच्या हस्ते झाले. खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या नवनियुक्त पहिल्या महिला उपाध्यक्षा कार्तिकी हिवरकर यांचा या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फडणवीस म्हणाले,लोकप्रतिनिधीला उत्तरदायित्वाची जाणीव असणे, हे भाजपच्या परंपरेला साजेसे काम सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे. आमचे नेतेच स्वतःला प्रधानसेवक म्हणतात, त्यामुळे आम्ही मालक होऊच शकत नाही. आम्हीही जनतेचे सेवकच आहोत.

लोकप्रतिनिधी हा समाजात, जनतेमध्ये फिरणारा असायला हवा. त्यामुळेच त्याची प्रगल्भता, प्रश्नांची जाण वाढते.

_MPC_DIR_MPU_II

घरी किंवा कार्यालयात बसून जनतेची सेवा होऊ शकत नाही. त्यातून फारसे यशही मिळत नाही. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, त्यांच्या पर्यंत त्याने पोहचायलाच हवे. तेच नेतृत्व आश्वसक नेतृत्व असते. हे सारे गुण सिद्धार्थ शिरोळे यांच्यामध्ये मला दिसतात.

हल्ली ‘होर्डिंगचे नेतृत्व’ असा नवा ट्रेंड आला आहे. कालपर्यंत माहित नसलेली पोरं स्वत:च्या नावाचे होर्डिंग लावून अमुक एक दादा, तमुक एक दादा होतात. मात्र, हे नेतृत्व आश्वासक होऊ शकत नाही. आव्हानांच्या काळात जे उभे राहते, तेच खरे नेतृत्व असते आणि तिथेच खऱ्या नेतृत्वाची कसोटी देखील लागते, असेही फडणवीस म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील पूल पडताना आम्ही विरोधाला विरोध न करता विकासाच्या दृष्टीने विचारपूर्वक भूमिका मांडून जनतेच्या हिताच्या बाजूने उभे राहिलो, असे सांगत यासाठी फडणवीस यांनी शिरोळे यांच्या वैचारिक प्रगल्भतेचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जर माझा कार्यक्रम असेल तर कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी व दोन दिवस नंतर राज्यात चांगल्याच बातम्या रंगतात, अशी मिश्कील टिपणीही फडणवीस यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले,आपल्या कामाचा असा अहवाल देणे ही भाजपची रामभाऊ म्हाळगींनी घालून दिलेली आदर्श परंपरा आहे. यामुळे आपण काय केले आहे आणि किती करायचे राहिले आहे, हे आपल्याला व जनतेला पारदर्शकपणे समजते.

लोकप्रतिनिधीला आवश्यक असणारी शोधक वृत्ती, वैचारिक बैठक, समाजासाठी काम करण्याची निष्ठा आणि कामाचा छडा लावण्यासाठी आवश्यक आग्रही भूमिका हे गुण सिद्धार्थ शिरोळे यांच्यामध्ये असल्याने पुणे शहर हे आश्वासक प्रतिनिधींच्या हाती असल्याची खात्री आहे.

सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वर्षभराचा लेखाजोखा, आलेले अनुभव, आपली भूमिका उपस्थितांसमोर विशद केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.