Pune News: यांना पोलीस म्हणावं की गुन्हेगार, पूर्ववैमनस्यातून एकाने दिली दुसऱ्याचा हत्येची सुपारी

एमपीसी न्यूज: पुणे पोलीस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच एका सहकार्‍याच्या खुनाची सुपारी एका सराईत गुन्हेगाराला दिल्याचे उघडकीस आले. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने वेळीच हा कट उघडकीस आला. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद आडसूळ (वय २८, रा. दत्तवाडी) याला अटक केली आहे. तर पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, कट रचणे यासह विविध कलमानव्ये दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 31 डिसेंबर रोजी दत्तवाडी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीत त्यांनी सराईत गुंड प्रल्हाद अडसूळ याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा सर्व कट उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ याने पोलीस कर्मचारी असलेल्या दिनेश दोरगे याच्या हत्येची सुपारी दिली होती.

अडसूळ हा सराईत गुन्हेगार आहे. एका गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. नुकताच तो पॅरोलवर सुटून बाहेर आला आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सापडले होते.त्यात या सर्व कटाचा उल्लेख होता. पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ व दिनेश दोरगे हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. दोघात काही वैयक्तिक वाद आहेत. या वादातूनच दुधाळ याने दिनेश दोरगे यांच्या हत्येची सुपारी सराईत गुन्हेगाराला दिली होती. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दत्तवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.