Pune News : पेट्रोल डिझेलचे शंभरपर्यंत दर… आता तरी थांबवा, मोदीजी जनतेची लूट : माजी आमदार मोहन जोशी

एमपीसी न्यूज – खाद्यतेला पाठोपाठ पेट्रोल, डिझेल अशा इंधनाची दरही लिटरमागे शंभर रुपयाच्या जवळ आले आहेत, पुण्या-मुंबईत एक दोन दिवसात दर शंभरी पार करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आता तरी ही जनतेची लूट थांबवा, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली असून मोदी सरकारचा निषेध केला आहे.

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आटोपताच सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे भाव वाढवायला सुरुवात केली आहे. देशभरात काही शहरात पेट्रोलचा डिझेलचा दर शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे. शहरातील पेट्रोलचा दर प्रति लिटर 99 रुपये आणि डिझेलचा दर 90 रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला आहे.

सध्या खाद्यतेलांचे दर लिटरमागे 25-30रुपयांनी गेला महिनाभरात वाढले आहेत, त्यातच इंधन दरवाढीची भर पडली आहे. इंधनाचे दर वाढले की अन्य जीवनावश्यक वस्तूंचीही भाववाढ होते. वर्षभरात खाद्यतेले लिटरमागे 40 ते 50 रुपयांनी महागली आहेत. साखर, तांदूळ, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढताहेत आणि आगामी काळात आणखी भडकतील अशी शक्यता बाजारपेठांमध्ये व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिकांचे जीवनमान अधिक बिकट होत चालले आहे, नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

कोविड साथीच्या काळात वैद्यकीय खर्च वाढले आहेत, नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. अशा बिकट स्थितीत केंद्रातील मोदी सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवू शकलेले नाहीत. ही स्थिती अशीच चालू राहिली तर जनतेच्या मोठ्या असंतोषाला केंद्र सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.