Pune News : लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचे बंड, हायकोर्टात जाणार !

एमपीसी न्यूज – ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे व्यापारी महासंघ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील व्यापारी वर्गाने सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत

राज्यात संचारबंदी असेल तर मग शिवथाळी आणि रिक्षा सुरु ठेवण्याला परवानगी कशी काय देऊ शकता, असा सवाल व्यापारी महासंघाने विचारला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी राज्यातील व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा अंतिम निर्णय होईल.

सरकार मोफत धान्य पुरवणार आहे, ते घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतील. तसेच शिवभोजन थाळीसाठीही नागरिकांची रीघ लागेल. मग तेव्हा गर्दी होणार नाही का? त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर पूर्णपणे अन्याय करणार आहे. फक्त व्यापाऱ्यांमुळेच राज्यात कोरोना पसरत आहे का, असा सवाल व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सध्या पुण्यातील व्यापाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. आता दुपारी चेंबर ऑफ कॉमर्सने बोलावलेल्या राज्यव्यापी बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.