Pune News : सागरी उद्योगात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील एमआरसीच्या वतीने ‘समर इंटर्नशिप’

एमपीसी न्यूज – ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ या विषयात काम करणाऱ्या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) च्या वतीने सागरी उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘समर इंटर्नशिप’चे आयोजन करण्यात आले आहे.

नीरध्वनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. (एनडीटी) यांच्या सहकार्याने आयोजित या ऑनलाईन इंटर्नशिपमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांबरोबरच या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण व्यावसायिकांना देखील अर्ज करता येणार असल्याची माहिती मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती डॉ. दास पुढे म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्राचा विचार केल्यास सध्या केंद्र सरकारच्या वतीने ‘सागर व्हिजन’ या संरक्षणात्मक प्रकल्पाबरोबरच सागरमाला, देशांतर्गत जलवाहतूक, जल संसाधन व्यवस्थापन, समुद्राच्या अंतर्गत भागात करण्यात येणारे खनन, मस्त्यव्यवसाय वाढीचे प्रयत्न याबरोबरच शाश्वत सागरी अर्थव्यवस्था यांवर भर देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरीही सागरी उद्योग व त्यातील व्यवसायाच्या संधी या बद्दल आपल्याला फारसे माहित नसते.

याउलट या क्षेत्रातील माहितीमुळे अनेक परदेशी कंपन्या त्यांच्या देशातील मनुष्यबळ घेऊन या क्षेत्रात कार्यरत कार्यरत आहेत. त्यामुळे यामधील उद्योगाच्या संधींचा फायदा भारतातील जास्तीत जास्त तरुण व काहीतरी नवे करण्याची इच्छा असणाऱ्या  व्यावसायिकांना व्हावा, या उद्देशाने आम्ही ऑनलाईन समर इंटर्नशिप सुरु करीत आहोत.”

सध्या देशातील परिस्थिती पहाता अर्जदार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून त्यांना या ऑनलाईन इंटर्नशिपमध्ये सहभागी होता येणार असून सहा आठवडे, आठ आठवडे, सहा महिने आणि 1 वर्ष अशा कालावधीत ही इंटर्नशिप पार पडेल.  मुख्यत: उपलब्ध प्रकल्प, शैक्षणिक संस्थांचा अभ्यासक्रम याबरोबरच अर्जदाराची आवड अशा बाबी यामध्ये महत्त्वाच्या असतील. सागरी उद्योगांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या व नजीकच्या भविष्यातील संधी, प्रकल्पाधारित संशोधन व शिक्षण, येणाऱ्या संधींशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक वैचारिक माहिती, या क्षेत्रातील तज्ज्ञ, भागधारक, सरकारी पातळीवर कार्यरत असणारे अधिकारी आदींशी संवाद साधण्याची संधी याद्वारे उपलब्ध होणार असल्याचेही डॉ. दास यांनी नमूद केले.

एमआरसीच्या या इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार हे किमान पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असणारे व मुख्य विषयांचे सखोल ज्ञान असणारे असायला हवेत. याबरोबर अर्जदाराला आपल्या स्वत:च्या सविस्तर माहितीसोबत ही इंटर्नशिप का करायची आहे याविषयी माहिती द्यावी लागेल. या माहितीच्या आधारे त्यांचे मूल्यांकन होऊन तज्ज्ञांसोबत त्यांची मुलाखत पडेल व या मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना इंटर्नशिपसाठी सहभागी करून घेण्यात येईल. एमआरसी व एनडीटीच्या वतीने 2017 सालापासून ही इंटर्नशिप घेण्यात येत असून यामध्ये पदवीधर, पदव्युत्तर पदवी व पीएचडी झालेल्या देशभरातील तब्बल 200 विद्यार्थी व विविध संस्थांतील तरुण व्यावसायिकांनी आजवर सहभाग घेतला असल्याची माहिती देखील या वेळी डॉ. दास यांनी दिली.

इंटर्नशिपनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मानधनासोबतच ‘युडीए प्रोजेक्ट फेलोशिप’ (एक सत्र) व ‘युडीए रिसर्च फेलोशिप’ (एक वर्ष) देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक व त्यांनी केलेल्या प्रकल्पांचा उल्लेख असलेले सन्मानपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे.

यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी एमआरसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा  https://mrc.foundationforuda.in/internship.html  ही लिंक तपासून पहावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.