Pune News : भुयारी मेट्रोसाठी दोन बोगद्यांचे काम पूर्ण !

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रोच्या मार्गिकेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या भुयारी मेट्रोसाठी रेंजहिल्स ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंतच्या दोन्ही बोगद्यांचे काम मंगळवारी (दि.10) पूर्ण झाले. आता मुठा नदी खालून भुयारी मेट्रोचा बोगदा खोदण्याचे काम सुरू होणार आहे.

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान सुमारे 16 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या काम सुरू आहे. त्यातील 5.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मेट्रो मार्ग असेल. रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान तो होणार आहे. त्यासाठी रेंजहिल्सजवळील कृषी महाविद्यालयाच्या आवारातून जानेवारीमध्ये भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी दोन ‘टनेल बोअरींग मशीन’ (टिबीएम) वापरण्यात येत आहेत.या मशीनची लांबी सुमारे 120 मीटर आहे.

कृषी महाविद्यालयाच्या आवारातून प्रत्येकी 5 मीटर 8 फुट व्यासाचे दोन बोगदे खोदण्यात येत आहेत. आता दोन्ही बोगद्यांचे शिवाजीनगर न्यायालयापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बहुमजली शिवाजीनगर स्थानक असेल. त्या ठिकाणीच पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए)हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो क्रॉस होणार आहे. त्यामुळे स्थानकाच्या आवारातून दोन्ही मेट्रो मार्ग उपलब्ध असेल.

या बोगद्यांतून मेट्रो मार्गांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पादचारी मार्ग असेल. तसेच दोन्ही बोगद्यांतून आपत्तकालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. बोगद्यात वीज, पाणी, पंखे आदी सुविधा असतील.

पुढच्या टप्प्यात मुठा नदीच्या खालून भुयारी मेट्रोसाठी दोन बोगदे खोदण्यात येणार आहेत. त्याच वेळी स्वारगेटकडून महात्मा फुले मंडईसाठी भुयारी मेट्रोच्या खोदाईचे काम सुरू होणार आहे. रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान कसबा पेठ, बुधवार पेठ आणि महात्मा फुले मंडई, अशी पाच स्थानके असतील, अशी माहिती महामेट्रोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पहिल्या टप्प्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वनाज – रामवाडी या 15 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचेही काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यानचा मार्ग पुढील वर्षी मार्चअखेर सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. त्यासाठी वनाज, आनंदनगर आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांचे काम सुरू आहे. या मार्गावर सुमारे 2. 5 किलोमीटर लोहमार्ग टाकण्याचेही काम पूर्ण झाले आहे.

तर, पिंपरी चिंचवड – स्वारगेट मार्गावर पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. या दोन्ही मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे काम पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महामेट्रोपुढे सध्या आहे त्यासाठी त्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.