Pune Metro : रिटर्न तिकीट बंद केल्यानंतर मेट्रोकडून एक दिवसाच्या पासची सुविधा सुरु

एमपीसी न्यूज – महामेट्रोने (Pune Metro) रिटर्न तिकिटांसंदर्भात ( Pune Metro ) निर्णय घेत 1 मार्च पासून मेट्रो प्रवाशांना मेट्रोचे रिटर्न तिकीट (Metro Return Ticket) बंद केले. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या दोन्ही वेळी स्वतंत्र तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता मेट्रोने एक दिवसाच्या पासची सुविधा सुरु केली आहे.

प्रवाशांना तिकिटासाठी मेट्रोकडून काउंटर तिकीट, व्हाटसअप तिकीट, एटीव्हीएम तिकीट, मेट्रो अॅप असे विविध पर्याय दिले आहेत. तसेच यामध्ये प्रवाशांना रिटर्न तिकीट देखील काढता येत होते. मात्र मेट्रोकडून हा रिटर्न तिकिटाचा पर्याय 1 मार्च पासून बंद करण्यात आला. आता प्रवाशांना दोन्ही मार्गावर प्रवास करताना प्रत्येक वेळी तिकीट काढावे लागत आहे.

महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC Metro Station) ते जिल्हा न्यायालय (Civil Court Metro Station) आणि वनाज (Vanaz Metro Station) ते रामवाडी (Ramwadi Metro Station) या दोन मार्गांवर मेट्रो सुरु झाली आहे. आता जिल्हा न्यायालय ते स्वारगेट (Swargate Metro Station) हा टप्पा सुरु होणे बाकी आहे. पुढील काही महिन्यात हा मार्ग देखील प्रवासासाठी खुला होणार आहे.

 

Loksabha Election : प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदान केंद्राची माहिती देण्याची व्यवस्था करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये मेट्रो चांगला पर्याय म्हणून समोर आली आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करत हजारो नागरिक दोन्ही शहरादरम्यान प्रवास करीत आहेत. मेट्रोने रिटर्न तिकीट सेवा बंद करून एक दिवसाच्या पासची (One Day Pass)सेवा सुरु केली आहे. 100 रुपयांमध्ये दिवसभर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

सकाळी सहा वाजता मेट्रोची सेवा सुरु होते. रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रो सुरु असते. या कालावधीत एक दिवसाचा पास काढून कितीही वेळ मेट्रोने प्रवास करता येणार आहे. एक दिवसाचा पास काढला आणि अवघ्या काही अंतरावर मेट्रोने प्रवास केला, त्यानंतर मेट्रोने प्रवास करणे शक्य झाले नाही तर भरलेली रक्कम परत मिळणार नाही. तसेच या पाससाठी कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे मेट्रो कडून ( Pune Metro ) सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.