Pune News: अमेरिकेच्या कौन्सिलेटची सिरम इन्सिटट्यूटसह पुणे विद्यापीठ व विविध संस्थांना भेटी

एमपीसी न्यूज – अमेरिकेचे कौन्सिलेट सी. जी. रांझ यांनी मंगळवारी (दि. 24) पुणे दौरा केला. त्यामध्ये त्यांनी सिरम इन्सिटट्यूट, पुणे विद्यापीठ, आयएनआय फर्म आणि भारतातील अमेरिकन कंपन्यांना भेटी दिल्या. शिक्षण, व्यापार, आरोग्य आणि विदेशी गुंतवणुकीवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

कौन्सिलेट रांझ यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला. कोरोनावरील लस हे आपण एकत्रितपणे साध्य केलेले यश असल्याचे त्यांनी म्हटले. या लसीसाठी भारत आणि अमेरिकेतील औषध कंपन्या आणि संस्थांनी मोठे काम केले असल्याचे ते म्हणाले.

पुणे विद्यापीठाला दिलेल्या भेटीत त्यांनी अमेरिका पश्चिम भारतातील शाळांमध्ये भागीदारी करण्यास उत्सुक असून त्याद्वारे नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रम, मुलींचे शिक्षण यावर आणखी काम करता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

भारतातील अमेरिकन कंपन्यांना देखील त्यांनी भेट दिली. अमेरिकेची थेट विदेशी गुंतवणूक या कंपन्यांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यातून लाखो भारतीयांना रोजगार मिळवून दिला जात आहे. भविष्यात होणारी अमेरिकेची भारतातील गुंतवणूक याबाबतही त्यांनी चर्चा केली.

अमेरिकेतील भारतीय कंपन्यांबाबत देखील त्यांनी मत मांडले. दोन्ही देशातील कंपन्या एकमेकांच्या देशात काम करत असल्याने दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होत आहेत. यातून कोरोनासारख्या अनिश्चिततेच्या काळात देखील दोन्ही देशांनी प्रगती साधली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आयएनआय फर्मला देखील कौन्सिलेट रांझ यांनी भेट दिली. फर्मद्वारे दिले जाणारे शेती आणि घरगुती खाद्य प्रक्रियेतील नोकरी, प्रशिक्षण यांच्या नावीन्यपूर्ण पद्धतींची माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.