Pune News : कोरोनाच्या उपचाराबरोबरच डायबेटीस, बीपी व इतर जुन्या आजारावरील औषोधोपचार सुरू ठेवा : आबा बागुल

क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना डायबेटीस, बीपी, किडनीचे आजार व इतर जुने आजार (क्रोनिक आजार) आहेत का ?. त्यांना कोणती औषधे सुरू आहेत, याची माहिती घेणे गरजेचे आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आटॊक्यात आणण्यासाठी कोरोनाच्या उपचाराबरोबरच डायबेटीस, बीपी, किडनीचे व इतर जुन्या आजारावरील औषोधोपचार देखील सुरू ठेवा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत बागुल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे कि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

कोरोना संशयितांना व त्यांच्या घरच्या व शेजारच्या व्यक्तींना हॉस्पिटल व होम क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. इतकी सर्व काळजी घेऊन देखील कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रमध्ये वाढताना दिसत आहे. या मागची कारणे शोधणे गरजेचे आहे.

नागरिक कोरोनाची तपासणी करण्यासाठी आले होते. परंतु, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले. हे नागरिक आपली नेहमीची औषधे किंवा फाईल न घेता रुग्णालयात तपासणीसाठी गेले व क्वारंटाईन होऊन बसले. त्यामुळे त्यांच्या जुन्या आजाराविषयी माहिती मिळाली नाही.

अश्या क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना डायबेटीस, बीपी, किडनीचे आजार व इतर जुने आजार (क्रोनिक आजार) आहेत का ?. त्यांना कोणती औषधे सुरू आहेत, याची माहिती घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात भेटू देत नाहीत व रुग्ण घाबरल्यामुळे क्रोनिक आजारा विषय माहित देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु असतात. परंतु, क्रोनिक आजारावर औषधे बंद असल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे.

यासाठी रुग्णांच्या जुन्या आजाराबाबत माहिती घेतल्यास संबंधित नागरिकांवर उपचार करणे सोपे होईल. परिणामी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आटॊक्यात आणण्यासाठी कोरोना बरोबरच क्रोनिक आजारावर औषधोपचार सुरु ठेवावा, याबाबत तात्काळ सर्व जिल्हाधिकारी व आयुक्तांना तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.