Pune : ‘बाबू….. समझो इशारे…. हॉर्न ना बजारे …… पॉम पॉम पॉम’ !

12 सप्टेंबर 'नो हॉर्न डे'

(विश्वास रिसबूड)

एमपीसी न्यूज- ‘बाबू….. समझो इशारे…. हॉर्न पुकारे…. पॉम पॉम पॉम’ असे एक हिंदी गाणे एकेकाळी खूप गाजले होते. पण आता मात्र वाहनचालकांच्या विनाकारण हॉर्न वाजविण्याचा वेडापायी ‘बाबू….. समझो इशारे…. हॉर्न ना बजारे…… पॉम पॉम पॉम’ ! असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण विनाकारण हॉर्न वाजवून स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याला बाधा पोहोचून ध्वनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची खरी गरज आहे. याच उद्देशाने पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 12 सप्टेंबर हा दिवस पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ म्हणून पाळला जाणार आहे.

पुण्यात 36 लाख वाहने रोज रस्त्यावरून धावत असतात. शिवाय बाहेरगावाहून देखील अनेक वाहने पुण्यात येत असतात. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलेली असताना या कोंडीतून वाट काढताना अनेक वाहनचालक गरज नसतानाही हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालत असतात. तुमच्या हॉर्न वाजवण्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार नसते.

गाडी चालवायची म्हणजे तिला हॉर्न हा असलाच पाहिजे. रस्त्यावरील इतर वाहनांना, पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी हॉर्नचा खूप फायदा होतो. बऱ्याचदा हॉर्नचा उपयोग ब्रेकसारखा उपयोग होऊ शकतो. हे झाले गाडीला हॉर्न असण्याचे फायदे. पण हे हॉर्न सुद्धा दुधारी शस्त्रासारखे असतात. त्याचा व्यवस्थित, आवश्यक तिथेच उपयोग केल्यास ते उपयोगी ठरतात. मात्र विनाकारण हॉर्न वाजवणे, चित्रविचित्र आवाजाचे हॉर्न वाजवणे, रात्रीच्यावेळी किंवा हॉस्पिटल, शाळा, सरकारी कार्यालयासमोरून जाताना विनाकारण हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणे हे मानसिक विकृतीचे लक्षण मानले पाहिजे. परदेशामध्ये विनाकारण हॉर्न वाजवणे हे अशिक्षितपणाचे लक्षण मानले जाते. आवश्यक तिथेच हॉर्नचा वापर केला जातो.

सुरक्षितपणे वाहन चालविणारा चालक कधीच हॉर्नचा वापर करीत नाही. पण एखादा नवशिक्या चालक वारंवार हॉर्न वाजवून इतरांना सावध करीत असतो. कारण वाहन चालविण्याबाबत त्याच्यामध्ये आत्मविश्वास नसतो. बऱ्याच लोकांना विशेषतः युवकांना दुचाकी चालवताना विनाकारण हॉर्न वाजविण्याची खोड असते. त्यांच्याकडे असते एखादी फडतूस दुचाकी, पण गाडीला हॉर्न मात्र कर्णकर्कश लावलेला असतो. यामधून त्यांना काय विकृत आनंद मिळतो कुणास ठाऊक ? मध्यंतरी डुक्कर हॉर्न नावाचा एक प्रकारचा हॉर्न ऐकायला मिळायचा. एखाद्या पादचाऱ्यांच्या मागे जाऊन अचानक तो हॉर्न वाजवला तर त्याचा नक्कीच हार्टफेल होईल. असा भयानक आवाजातील हॉर्न वाजवायचा आणि समोरच्या पादचाऱ्यांचा मजा पाहायची असा छंदच काही जणांना जडला होता. पुढे पोलिसांनी अशा प्रकारच्या हॉर्नवर बंदी घातली आणि सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.

मालवाहू ट्रकला देखील इतके कर्णकटू आणि लांबलचक वाजणारे हॉर्न लावलेले असतात की ऐकणाऱ्याच्या कानाचे पडदे फाटतील. आता तऱ्हेतऱ्हेचे हॉर्न बाजारात आलेले असून ध्वनी प्रदूषणात भर घालत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रबरी फुग्याचे पॉम पॉम वाजणारे हॉर्न वाहनांना बसविण्याची गरज आहे असे वाटू लागले आहे. (फार पूर्वी पुण्यात पीएमटी बसला, रिक्षांना असे हॉर्न बसवलेले असायचे)

हॉर्न वाजविल्यामुळे आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. मानसिक तणाव, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कायमचा बहिरेपणा, मानसिक नैराश्य अशा रोगांना आमंत्रण मिळते. हॉर्नच्या आवाजाने वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांमध्ये घबराट निर्माण होते. या उलट हॉर्न न वाजवता वाहन चालविल्यास तणावमुक्त ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो. वाहनाचा वेग नियंत्रित राहतो. सर्वात महत्वाचे म्हणजे ध्वनी प्रदूषणाला आळा बसतो.

म्हणूनच वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या नेतृत्वाखाली आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत व विनोद सगरे यांच्या संकल्पनेतून पुणे शहर आणि जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ पाळला जाणार आहे. या मोहिमेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. या दिवशी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वाहनांना ‘नो हॉर्न’चे स्टिकर लावण्यात येणार असून वाहनचालकाच्या हाताला ‘नो हॉर्न’चा बँड बांधून हॉर्न न वाजविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच ड्रायव्हिंग स्कूल आणि आरटीओ कार्यालयाच्या परिसरात जनजागृती करणारे फलक लावण्यात येणार आहेत.

त्यामुळे पुणेकरांनी ! केवळ 12 सप्टेंबरच नव्हे, तर या पुढे ‘नो हॉर्न प्लिज !!’ अशी शपथ घ्या. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ध्वनी प्रदूषण टाळा !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.