Pune : पुणे पुस्तक महोत्सवा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली

एमपीसी न्यूज – ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ या संस्थेच्या वतीने (Pune)फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

डेक्कन जिमखान्यावरील ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ या दुकानात बाबासाहेब नियमितपणे पुस्तके खरेदी करण्यासाठी येत असत. बाबासाहेबांचे पुस्तकांविषयीचे प्रेम हे सर्वश्रृत आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूत महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी(Pune), ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, साहित्यिका डॉ. श्यामाताई घोणसे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण खोरे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, ॲड. मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
लिंबाळे म्हणाले, ‘ माझ्या आयुष्यात मी अनेकदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

परंतु आज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुस्तकांच्या दुकानात अशा अनोख्या पद्धतीने अभिवादन करता आले, हे कायम माझ्या स्मरणात राहील. बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन प्रेम विलक्षण होते. ते रात्री उशीरापर्यंत वाचन करायचे. इतर समाज जागा झाला आहे, परंतु माझा समाज अजूनही झोपेत आहे. या समाजाला जागे करून ज्ञानाचा प्रकाश द्यायचा असेल, तर आम्हाला जास्तीत जास्त वाचन करावे लागेल, असे बाबासाहेबांचे मत होते.’

या वास्तूचे महत्त्व विषद कराना डॉ. खोरे म्हणाले, ‘ही वास्तू 1931 मध्ये स्थापन झाली. या पुस्तकाच्या मोठ्या दुकानात बाबासाहेब पाठीमागच्या बाजूने येत असत. दुकानाचे संस्थापक मालक विठ्ठलराव दीक्षित यांच्याशी ते गप्पा मारायचे, विठ्ठलराव त्यांना टेबलावर पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेब कपाटांच्या भोवती फेरी मारून पुस्तकांची निवड करायचे. यावेळी बाबासाहेबांचे कार्यकर्ते दुकानाबाहेर मोठी गर्दी करायचे.’

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पुस्तकांचे वाचन करणारा आणि पुस्तक प्रदर्शनातील सर्व दालनाला भेट देणारा राजकीय नेता पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने भेटावा अशी अपेक्षा डॉ. खोरे यांनी व्यक्त केली.

Marathi Sahitya Sammelan : नेपाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजन लाखे

डॉ. घोणसे म्हणाल्या, ‘आपण प्रतिकुलतेचे गाऱ्हाणे गात असतो. बाबासाहेबांच्या जीवनात अनेकदा प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली. परंतु न डगमगता त्यांनी तिच्यावर मात केली. हे त्यांचे वेगळेपण आहे. त्यांच्या संग्रहात पन्नास हजारांहून अधिक पुस्तके होती. त्यांनी नेहमीच सर्वसमावेषक भारताचा विचार केला. म्हणूनच आज देश एक राहिला आहे.’

पांडे म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव पुणे जागतिक पुस्तकांची राजधानी व्हावी आणि वाचन संस्कृतिला चालना मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांचे पुस्तकांवर प्रेम होते. पोटाएवढेच ते पुस्तकाला महत्त्व देत. बाबासाहेबांचा पुस्तक वाचनाचा संदेश समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पाहोचावा यासाठी पुणे पुस्तक महोत्सवाचा शुभारंभ या वास्तूत केला.’

कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी पुस्तक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. मंदार जोशी यांनी स्वागत केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. सुनिल भंडगे यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.