Pune : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास रूपेरी पडद्यावर; प्रवीण तरडे साकारणार भूमिका

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या कार्यकाळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित मराठी चित्रपट येत आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मुळशी पॅटर्न या यशस्वी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले आहे.  नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

पिळदार शरीरयष्टी आणि रांगडा पेहराव यासोबतच हातात दुधारी तलवार  घेऊन उभे असलेले सरसेनापती ‘हंबीरराव मोहिते’ या नवीन मराठी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर  चांगलेच व्हायरल होत आहे. या पोस्टर मध्ये हातात दुधारी तलवार असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते अभेद्य असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे पाहताना दिसत आहेत. लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची तिथीनुसार  साजर्‍या केल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहुर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

या ऐतिहासिक चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून संदीप पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.’जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा’ असे लिहीलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारे अभिनेते प्रवीूण तरडे लक्षवेधी ठरत आहेत. एका झुंजार सरसेनापतीचा धगधगता इतिहास यावर्षी जून मध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.

देऊळ, मुळशी पॅटर्न या यशस्वी चित्रपटा नंतर प्रविण तरडे सरसेनापती ‘हंबीरराव मोहिते’ यांच्या रूपाने नवीन ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. अलिकडे ऐतिहासिक चित्रपटांची चांगलीच चलती असल्याने या चित्रपटाविषयी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.