Pune : लॉकडाऊनमध्ये अडकलेले नांदेडचे 38 मजूर पुण्याहून स्वगृही रवाना

Pune: 38 laborers stranded in Pune due to lockdown left for their home city Nanded

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात पुण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील 38 मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधून आज, शुक्रवारी (दि. 8) पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

या मजुरांना पाठविण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोविड-19 च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरु असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली. ते कामगार थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, त्या मजुरांना त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले.

तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बाटली सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या 38 प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले. मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.