Wakad : पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा घरात घुसून राडा

Wakad: Out of old rivalry, the mob entered forcefully into the house and vandalized the stuff

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून आठ जणांनी मिळून बेकायदेशीररित्या घरात घुसून राडा घातला. घरातील साहित्य फोडले. यात दोघेजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 7) रात्री राजवाडेनगर काळेवाडी येथे घडली.

रजिया हैदरसाब शेख (वय 40, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळ्या नाईक, बबल्या (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. काळेवाडी) आणि त्यांच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचा भाचा आयुब इमामुद्दिन उस्मान याचे एका महिलेसोबत बुधवारी भांडण झाले. त्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर जबरदस्तीने घरात घुसून बाळ्या नाईक याने शिवीगाळ करत धमकी दिली. फतिजा शेख या महिलेला अंगावर लाकडी दांडके उगारून आरोपींनी मारण्याची धमकी दिली.

घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकीची तोडफोड केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या खिडकीची काच फोडली. त्यामध्ये फिर्यादी शेख जखमी झाल्या. तसेच आरोपींनी मारलेल्या दगडांमुळे फिर्यादी यांच्यासह अन्य एक महिला जखमी झाल्या. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.