Pune : कचऱ्याच्या समस्येवर पुणेकरांच्या माथी अधिभार ? पक्षनेते घेणार निर्णय

एमपीसी न्यूज- महापालिकेकडून शहरातील कचऱ्यावर दरवर्षी 300 ते 400 कोटींचा खर्च करूनही ही समस्या सुटण्यास काही तयार नाही. त्यामुळे कचऱ्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला किमान शंभर ते पाचशे रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रशासनाने स्थायी समितीवर ठेवलेला प्रस्ताव समितीने पक्षनेत्यांच्या बैठकीत पाठवला आहे. त्यामुळे पुणेकरांवर अधिभार लावायचा की दिलासा द्यायचा हा निर्णय आता सर्वपक्षीय नेते घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडून यूजर चार्जेसच्या नावाखाली हे शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे.

पुणे शहरात दररोज सुमारे दोन हजार टन कचरा जमा होतो. त्यापैकी अकराशे ते बाराशे टन कचरा ओला असतो. प्रत्येक घरात तयार होणारा कचरा गोळा करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. कचरा गोळा करण्याचे काम पालिकेने ‘स्वच्छ’ संस्थेला दिले आहे. प्रभागांमधील सोसायट्या, बैठी घरे, रुग्णालय तेथील कचरा उचलण्यासाठी पालिका प्रशासकीय शुल्क म्हणून ‘स्वच्छ’ला दरवर्षी साडेतीन ते पावणेचार कोटी रुपयांचे अनुदान देते. तरीही ते काम समाधानकारक होत नाही.

त्यामुळे पालिकेकडून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी युजर चार्जेस आकरण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडून कचरा व्यवस्थापन शुल्क म्हणून किती रक्कम घ्यावी यासाठी वार्षिक करपात्र दराचा आधार घेतला आहे. ज्या भागातील करपात्र रकमेचा दर जास्त असेल त्यांना जास्त शुल्क, तर ज्यांची करपात्र रक्कम कमी त्यांना कमी शुल्क लावला आहे. दरमहा शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत शुल्क आकरणार आहे. असे प्रस्तावात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.