Pune Rural Crime News : लेबर कॉन्ट्रॅक्टरला दरमहा वीस हजाराच्या हप्त्यासाठी ठार मारण्याची धमकी, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून मागील दोन वर्षांपासून दरमहा दहा हजार रुपये हप्ता उकळून आता दरमहा वीस हजार रुपये हप्ता द्यावा यासाठी कॉन्ट्रॅक्टरला ठार मारण्याची धमकी देणार्‍यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली तर एक साथीदार फरार आहे. अनुप बाळासाहेब मारणे आणि सुभाष शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रसाद नवसकर हा तिसरा आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्ती हे मुळशी तालुक्यातील एका कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. आरोपी अनुप मारणे आणि त्याचे साथीदार रितेश शिंदे, प्रसाद नवसकर यांनी तक्रारदार यांना फोन करून हप्त्याची मागणी केली. तसेच हप्ता न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

आरोपी हे फिर्यादीकडून दर महिन्याला खंडणीच्या स्वरूपात दहा हजार रुपये हप्ता घेत होते. ऑक्टोबरपासून त्यांनी हप्त्याची रक्कम वाढवून वीस हजार रुपये इतकी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी आरोपींनी तक्रारदार यांना ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने त्यांच्याजवळील पंधरा हजार रुपये काढून घेतले होते. आरोपींनी आतापर्यंत तक्रारदाराकडून 2 लाख 50 हजार रुपयांची खंडणी उकळली आहे.

तक्रार यांनी शनिवारी पौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आणि अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.