Pune : संत निरंकारी मंडळाचे कात्रज परिसरात स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मंडळ पुणे विभागाच्या वतीने पुण्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शुक्रवारी (दि. 27) कात्रज परिसरातील के. के. मार्केट, अरण्येश्वर, धायरी, रायकर मळा, वडगाव, टांगेवाला कॉलनी येथे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पिंपरी, भोसरी परिसरातील सुमारे 300 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

बुधवारी (दि. 25) पुण्यातील झालेल्या पावसामुळे कात्रज परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी पाणी साचले. नागरिकांच्या आणि वाहनांच्या वाहून जाण्याच्या घटना घडल्या. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली.

के. के. मार्केट, अरण्येश्वर, धायरी, रायकर मळा, वडगाव, टांगेवाला कॉलनी या परिसरात दहा फुटांपेक्षा जास्त उंचीपर्यंत पाणी आले. सोसायट्यांच्या पार्किंग आणि घरांमध्ये पाणी शिरले. अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले.

या परिस्थतीतून सावरण्यासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने मदतकार्य करण्यात आले. पूर्वस्थितीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि चिखल साचला. नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे पिंपरी आणि भोसरी परिसरातील 300 पेक्षा अधिक स्वयंसेवक मदतीला धावले. सर्वांनी मिळून परिसरात स्वछता मोहीम राबवली.

मागील महिन्यात कोल्हापूर, सांगली या ठिकाणी आलेल्या पूर परिस्थितीत देखील संत निरंकारी मंडळाने कोल्हापूरमधील वळिवडे, प्रयाग, चिखली या गावांमध्ये मदतकार्य करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.