Pune : ससाणे एज्युकेशन सोसायटीने जपला सावित्रीमाईंचा वारसा; संस्थेची इमारत दिली कोरोना क्वारंटाइन सेंटरसाठी

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमध्ये पुणे मनपा प्रशासनाच्या विनंतीवरून कोरोना क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यासाठी ससाणे एज्युकेशन सोसायटी या संस्थेची इमारत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.

हडपसर येथील ससाणे एज्युकेशन सोसायटी चेअरमन गोरक्षनाथ देवराम ससाणे व ससाणे पंचवाडा मंडळाचे चेअरमन बाळासाहेब हरिभाऊ ससाणे,  व सर्व संचालक मंडळाने संस्थेची एक इमारत पुणे मनपा आरोग्य विभागास क्वारंटाइन सेंटर सुरु करण्यासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार या इमारतीची पाहणी महापालिका अधिकारी मुल्ला, नगरसेवक योगेश ससाणे, संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ ससाणे यांनी गुरुवारी केली.

यावेळी सध्याच्या संकटकाळात कर्तव्य म्हणून संस्थेची इमारत क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यासाठी देण्याच्या सकारात्मक निर्णय घेतला असल्याची भावना गोरक्षनाथ ससाणे व बाळासाहेब ससाणे यांनी बोलून दाखवली.

सन १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ आली होती. तेव्हा हजारो लोक मरण पावले होते. तेव्हा सावित्रीमाई फुले यांना प्लेगमधील अडकलेल्या लोकांचे हाल सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपिडितांसाठी पुणे शहराजवळील ससाणे याच्या माळावर हाॅस्पिटल सुरू केले. त्यावेळी त्यांनी स्वतः प्लेग पिडीतांची सेवा केली होती.  हाच तो ससाणे माळा म्हणजे आजचे ससाणेनगर आहे.

आजच्या कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही ससाणे कुंटुब सावित्रीमाईंच्या विचाराचा वारसा म्हणून प्रशासनास ही इमारत मदत म्हणून देत आहोत. संस्थेच्या प्रांगणात १५ मार्च २०२० रोजी फुले दापंत्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले होते. आता त्याच आवारात कोरोना क्वांरंनटाइन सेंटर चालू झाल्याने सावित्रीमाई व ज्योतीराव फुलेंना या माध्यमातूनन एक प्रकारे आदरांजली वाहीली जाईल यांत काही शंका नाही, असे योगेश ससाणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.