Pune : विशेष मुलांनी लुटला प्रथमच मल्हारगड येथे दुर्गभ्रमंतीचा आनंद

एमपीसी न्यूज- ‘जागतिक मैत्री दिना’ निमित्ते पुणे परिसरातील ‘विशेष मुलां’नी पहिल्यांदाच दिवेघाटातील मल्हारगड येथे दुर्ग भ्रमंतीचा आनंद घेतला.
‘अलाईव्ह’ संस्थेच्या ‘चला घेऊया निसर्गानुभव’ या उपक्रमात एकुण 16 विशेष मुलामुलींनी त्यांच्या 16 पालकांसह मल्हारगड पायथापासून ते वर बालेकिल्ल्यापर्यंत वर्षाविहारसह दुर्ग भ्रमंती आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवली.

या उपक्रमात गतिमंद, अध्ययन अक्षमता, स्वमग्न, अंध, अतिचंचलता, सेरेब्रल पाल्सी, अश्या विविध आजारांनी ग्रस्त असलेली विशेष मुले सहभागी झाली होती. विशेष मुलांना शहरात रोज दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा वेगळे जग असते त्याची जाणीव व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बसने दिवेघाटातून जाताना दिसणाऱ्या खोल दर्‍या, उंच-उंच डोंगर, डोंगरावर येणारे ढग असा नेहमीपेक्षा वेगळा नजारा पाहून ही मुले आनंदीत झाली. बसचा प्रवास संपून गडाच्या पायथ्यावर पोचल्यावर समोर दिसणारा मोठा डोंगर, परिसरात पसरलेले वेगवेगळ्या आकाराचे दगड, मधेच कुठे माती, गवत, खुरटी झुडुपं हे सगळं पाहून मुलांना कुतुहल वाटत होते.

किल्ला चढताना मुलांनी चिखलातून चालणे, पावसात भिजणे, तसेच घसरण्याची देखील मज्जा घेतली. साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या चढाईनंतर सर्व मुले सुखरुप बालेकिल्ल्यावर पोहोचली. गडफेरीत किल्ल्यावरील वास्तुंचे अवशेष, मंदिर, भला मोठा उंच दगडी दरवाजा, दणकट बुरुज, तटबंदीचे बांधकाम बघून मुले अचंबित झाली.

गडावरुन दिसणारी लांबचलांब डोंगररांग, अंगाला स्पर्श करुन जाणारे ढग, धुकं एकदमच विरल्यावर दिसणारे विलोभनीय दृश्य पाहून मुले हरखून गेली. गड पायउतार होताना चिंचोळ्या रस्त्यावरुन चालण्याचाही अनुभव गाठीशी बांधत सर्वजण पायथ्याशी सुखरुप पोचले. या उपक्रमाचे नेतृत्व अलाईव्हचे सदस्य प्रशांत पिंपळनेरकर आणि दर्शना पिंपळनेरकर यांनी केले. दर्शना पिंपळनेरकर म्हणाल्या, ”विशेष मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी निसर्ग ही सर्वात मोठी आणि योग्य शाळा आहे. निसर्गात मुलांची आकलन शक्ति, अनुभव विश्व देखील वाढते. त्यामुळे त्यांच्या शक्तीचा योग्य प्रकारे वापर होऊन दैनंदिन क्रियेत त्यांची सक्रियता वाढते.”

‘आमची मुले कधी किल्ल्यावर चढू शकतील असा कधीही विचार केला नव्हता. परंतु ‘अलाईव्ह’संस्थेच्या ‘चला घेऊया निसर्गानुभव’ या उपक्रमामुळे हे शक्य झाले. मुलांच्या बरोबरीने चालताना आमचाही आत्मविश्वास दुणावला’ अशी भावना सहभागी विशेष मुलांच्या सर्व पालकांनी व्यक्त केली. या उपक्रमात मुलांना सांभाळून घेण्यासाठी यश खामकर आणि विनय धायबर या विशेष युवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.