Pune : लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना घरी सोडण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष परवाना

एमपीसी न्यूज – पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असनू, केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष परवाना देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

याबाबत पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांनी लेखी आदेश काढले आहेत. त्यानुसार २३ मार्चपासून लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी किंवा त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष परवाना देण्यात येणार आहे. तसेच हा परवाना एका वेळेपुरताच असेल, असे या आदेशात म्हटले आहे.

हा परवाना लोहगाव विमानतळावर विमानतळ पोलिसांकडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या परवान्यावर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि प्रवासाचा मार्ग नमूद करण्यात येणार आहे. तसेच परवाना दिलेल्या वाहनचालकाने परवान्यावर नमूद मार्गानेच प्रवास करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

स्वीगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्टच्या सेवांनाही सवलत

या आदेशात स्वीगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट व अन्य संस्थांच्या सेवा घरपोहोच पुरविणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे. तसेच विविध आस्थापनांना व गृहसंकुलांना सुरक्षा पुरविणारे सुरक्षा रक्षक यांची ने- आन करणाऱ्या वाहनांनाही यामध्ये सवलत असणार आहे. तसेच अति तातडीच्या प्रसंगी नागरिक ‘डायल रिक्षा’चा पर्यायही वापरू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.