Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे काल रात्री 8.50 ला पांचाळेश्वर घाट येथे झाले विसर्जन

एमपीसी न्यूज – जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… पुण्याचा (Pune) अधिपती दगडूशेठ गणपती… च्या जयघोषात गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी झाला. महिनाभरापूर्वी विसर्जन मिरवणुकीत दुपारी 4 वाजता सहभागी होण्याच्या केलेल्या घोषणेप्रमाणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सांगता मिरवणुकीला दुपारी 4 वाजता थाटात प्रारंभ झाला. तर, पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता विसर्जन झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने (Pune) ट्रस्टच्या 131 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता. तसेच आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला.
मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी सहभागी झाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक (Pune)विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.
टिळक चौकामध्ये रात्री 8.20 च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता विसर्जन झाले. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाल्याची भावना ट्रस्टच्या विश्वस्तांनी व्यक्त (Pune) केली.