Pune : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा ऋणनिर्देश व सत्कार सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आव्हानात्मक परिस्थितीतही सामान्य (Pune) नागरिकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधत, संवेदनशीलपणे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले. याच वृत्तीमुळे कोणत्याही पदाचा, कामाचा दबाव राहिला नाही; उलट आनंददायी वातावरणात अनेक चांगली कामे मार्गी लावता आली, याचे समाधान आहे,” अशी भावना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (आयएएस) यांनी व्यक्त केली.

भूमाता परिवार, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब फाउंडेशन आणि शुगरटुडे मॅगेझीनच्या संयुक्त विद्यमाने शेखर गायकवाड (आयएएस) यांच्या शासकीय सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित ऋणनिर्देश व सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात कृषी महर्षी बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रसंगी गायकवाड यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार, सहकार आयुक्त अनिल कवडे, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता हनुमंतराव धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील, वंदना गायकवाड, शालिनीदेवी मुळीक, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी कुलगुरू शंकरराव मगर, उद्योजक बी. बी. जाधव, ज्येष्ठ संपादक आणि शुगर टुडे मॅगझिनचे प्रमुख नंदकुमार सुतार, फौंडेशनचे अध्यक्ष अतुल हिवाळे यांच्यासह साखर उद्योगातील अनेक मान्यवर, कारखानदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला.

शेखर गायकवाड म्हणाले, “मला मिळालेल्या प्रत्येक विभागात काम (Pune) करताना सामान्य नागरिक आणि शेतकरी हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू राहिला. त्यांच्या नेमक्या अडचणी समजून घेत संवाद व समन्वयाने त्या सोडवल्या. संबंधित विभागाची प्रगती आणि प्रतिमा उंचावेल अशा स्वरूपाचे काम केले. हसत खेळत, सहज कामाचा आनंद घेतला. निरीक्षणातून, घडलेल्या प्रसंगातून लेखन केले. हे लेखन अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले, याचे समाधान आहे.” आगामी काळात महाराष्ट्र जागतिक पातळीवर साखर उद्योगाचे नेतृत्व करेल, असेही यावेळी शेखर गायकवाड यांनी नमूद केले.

Ashadhi Wari 2023 : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची पालखीमार्ग व पालखीतळांना भेट

अनिल कवडे म्हणाले, “गायकवाड यांच्या प्रशासकीय सेवेला प्रामाणिकतेची झालर आणि लेखनाला धार आहे. नाविन्याची कास, ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा अधिकारी आहे. प्रशासनातून निवृत्ती घेतली, तरी कामातून निवृत्त होणार नाही. जनशिक्षण, लोकजागृतीचे काम त्यांनी केले. मानव निर्देशांकात सुधारणेसाठी काम व्हावे. कोणाशीही सहज संवाद, उत्तम निरीक्षण शक्ती, हजरजबाबी आणि विनोदी शैली यामुळे गायकवाड यांची वेगळी ओळख आहे.”

डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, “शेतकरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्या घटकाच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी गायकवाड यांना अनेकदा मिळाली. प्रामाणिक, सुसंवादी, सर्वांत मिसळण्याची त्यांची वृत्ती यामुळे प्रशासनात राहून, अनेक मंत्र्यांसोबत काम करूनही त्यांची प्रतिमा आदर्श घेण्याजोगी आहे. सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे, अभ्यासू व आकलनक्षमता असणारे फार मोजके अधिकारी आहेत. त्यामध्ये शेखर गायकवाड अग्रस्थानी आहेत.”

अशोक पवार यांनीही गायकवाड यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन मानसिंह पवार यांनी केले. आभार नंदकुमार सुतार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.