Pune : आत्महत्या करणे हा मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाही – प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

भैरवनाथ उद्योग समूहातर्फे 35 आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. आत्महत्या केल्याने आरक्षण मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. परंतु, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. याआधीच्या मराठा आंदोलना दरम्यान 42, तर यावेळच्या मराठा आंदोलनावेळी 35 मराठा तरुण-तरुणींनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या हा मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाही. त्यामुळे मराठा समाजासह इतर समाजातील तरुणांनीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत आणि किराणा साहित्य वितरित करण्यात आले.

तसेच या कुटुंबातील मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणारे महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी दोन धनगर समाजातील कुटुंबांची मदत देण्यात आली.

प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले, “मागील दोन महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. मागीलवेळी देखील मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढण्यात आले. त्यादरम्यान 42 जणांनी आत्महत्या केली.

अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलन सुरू झाले. आताही आरक्षण मिळावे, यासाठी काही तरुणतरुणींनी आत्महत्या केल्याच्या दुःखद घटना घडल्या. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे.”

“घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे कोणीही पाहत नाही. आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल. परंतु कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की, टोकाचा निर्णय घेऊ नका. हा लढा कशासाठी सुरू आहे ते पहा. शासन आपला निर्णय घेईल. मराठा समाज माझा असून, आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये आणि दिवाळी फराळ देण्यात येत आहे. संबधित कुटुंबातील मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व आणि मुलींचे लग्नापर्यंतचा खर्च उचलणार आहे,” असेही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी नमूद केले.

लढाऊ वृत्ती जोपासा : छत्रपती संभाजी राजे

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान केले आहे. मला अत्यंत दुःख वाटत आहे की, संबधित समूहातील कुटुंबाशी कोणती चर्चा करू, असे माझ्या मनात वाटत होते. परंतु, समाज प्रबोधन गरजेचे आहे.

आत्महत्या हा योग्य मार्ग नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला लढा देण्यास शिकवले आहे. राज्यात आत्महत्या होणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढण्याची शिकवण आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जीवनात काम केले पाहिजे. जीवनात अनेक संकट येतात; पण त्यावर विजय मिळवायचा असेल, तर लढा देऊनच मिळवावा लागेल, हे सर्व समाजातील लोकांनी लक्षात घ्यावे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.